
सावर्डे : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील त्याग, समर्पण व बलिदानाची प्रेरणा जपण्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या शुभहस्ते आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यानंतर योगेश नाचणकर व गौरी शितोळे यांनी तयार केलेल्या सचित्र भित्तीपत्रकाचे उद्घाटन सहाय्यक शिक्षक संदीप पवार यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी प्राचार्य राजेंद्र वारे यांनी ‘करेंगे या मरेंगे’ या घोषणेतून उभ्या राहिलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा ऐतिहासिक संदर्भ सांगत, क्रांतिकारकांचे जीवनचरित्र वाचणे ही आजची गरज असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षक मनोगतात योगेश नाचणकर यांनी क्रांतिवीरांच्या योगदानाची माहिती सविस्तर दिली.