
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लाईज युनियन यांच्यात पुढील चार वर्षासाठी वेतन करार झाला. यामध्ये कर्मचार्यांना विविध सुविधांसह वेतनात 1500 ते 7 हजार रुपयांपर्यंत वाढ मिळणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्यांचा वेतन कराराची मुदत डिसेंबर 2024 मध्ये संपली होती. त्यानंतर वेतन करार झाला नव्हता. हा करार पुढील चार वर्षासाठी असणार आहे. या वेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील साळवी व पदाधिकारी उपस्थित होते. या करारानंतर पत्रकारांना माहिती देताना अडसूळ म्हणाले, बँकेला यावर्षी 94 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, नफ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. बँकेच्या वाटचालीत कर्मचारी नेहमीच चांगली भूमिका बजावत आले आहेत; मात्र नफा किती वाढला तरी बँक चालवताना, बँकेला काय परवडेल याचा विचारही वेतन करार करताना करण्यात आला आहे. मागील कराराप्रमाणेच हा करार करण्यात आला असून, याला संचालक मंडळाने सहकार्य केले आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व सहकार्यांनी कर्मचार्यांसाठी चांगली भूमिका घेतली आहे. अनेक सुविधांना मान्यता दिली आहे. कर्मचार्यांना चार टक्के व्याजाने 75 लाखापर्यंत घरकर्ज, 4.5 टक्के व्याजाने वाहनकर्ज, वैयक्तीक कर्ज, मेडीक्लेम, ग्रॅच्युईटीसारख्या सुविधांचा लाभ करारामुळे मिळणार आहे. नवीन कर्मचार्यांना दीड हजार रुपये तर जुन्या कर्मचार्यांना सात हजारपर्यंत वेतनवाढ मिळणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.
सहकारविषयक धोरण चांगले
केंद्र सरकारचे सहकारविषयक धोरण चांगले असल्याचे सांगताना अडसूळ म्हणाले, सहकार खात्यापूर्वी कृषिखात्याशी संलग्न होते; मात्र सहकार विभागाची व्याप्ती लक्षात घेतल्यानंतर केंद्र शासनाने सहकार खाते वेगळे करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू आहे. सहकारी उद्योगाला पूरक धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले.










