महेश गणवे शिंदे सेनेत

Edited by: मनोज पवार
Published on: November 10, 2025 18:40 PM
views 115  views

मंडणगड : स्थानीक स्वराज्य संस्थाचे निवडणुकांचे पुर्वतयारीला तालुक्यात आघाडी युती व आयत्यावेळीच्या राजकारणाच्या वेगवान घडामोडी घडत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुंबई विभाग संपर्क प्रमुख समाजसेवक महेश गणवे यांनी आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह ९ नोव्हेंबरला मंत्री योगेश कदम यांच्या सोवेली येथील निवासस्थानी आयोजीत कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला.

तालुक्यातील राजकीय घडामोडींचा विचार करता हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे कारण हा प्रवेश होत असताना गृहराज्य मंत्री योगेश कदम यांना निवडणुकीत अडचणीत आण्यासाठी उबाठा, राष्ट्रवादी अजीत पवार गट, आय कॉंग्रेस या तीन पक्षाची अतिशय महत्वाची एकत्रीत बैठक शहरात संपन्न झाल्याची माहिती पुढे येत आहे. शिवसेना भाजपा महायुतीचे विरोधात उर्वरीत सर्व पक्षाची एकत्रीत मोट बांधण्यासाठी मोठ्या घडामोडी तालुक्यात सुरु असताना उबाठा गटाचा महत्वाच्या शिलेदाराने उबाठाला जय महाराष्ट्र करीत निवडणुक निकालाचे वारे कोणत्या दिशेने जाणार आहेत याची छोटीशी झलक दिली यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्य मंत्री योगेश कदम श्री. गणवे यांचे निकटतम सहकारी उद्योजक दीपक घोसाळकर, अवधूत घोसाळकर, बिलाल म्हाळुंगकर, संदेश चिले व कार्यकर्ते उपस्थित होते.