
रत्नागिरी : जिल्हा महिला व बाल विकास विभाग रत्नागिरी यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या मिशन शक्ती या एकछत्रीत योजनेत राबविण्यात येत असलेल्या सखी वन स्टॉप सेंटर व महिला सक्षमीकरण केंद्र मार्फत 2 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या 10 दिवशीय विशेष महिला केंद्रित विषयांचे जनजागृती अभियान रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आले. सदर अभियान अंतर्गत जनजागृती शिबिर कार्यशाळा सामूहिक कार्यक्रम राबविण्यात आले.
सखी वन स्टॉप सेंटर हे पीडित महिलेला एकाच छताखाली वैद्यकीय मदत, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला, समुपदेशन व तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था विनामूल्य व 24 तास पुरविते. कौटुंबिक हिंसाचार,लैंगिक अत्याचार,तस्करी,ऍसिड हल्ला या सारख्या गंभीर हिंसेला बळी पडलेल्या महिलांकरिता हे केंद्र काम करते. गेल्या पाच वर्षात 850 हून अधिक महिलांना आधार देण्याचे काम सखी सेंटरने केले आहे. तसेच 165 हून अधिक तुटलेले संसार फुलवण्याचे काम सखीने केले आहे.याचबरोबर महिला सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून महिला व मुलींसाठीच्या योजना गरजू पर्यंत पोहोचविण्याचे काम केले देखील आहे.महिलांना आवश्यक असलेली मदत महिला हेल्पलाइन 181 च्या माध्यमातून पुरविली जाते.
दहा दिवसीय विशेष महिला केंद्रित विषयांचे अभियान राबविताना बेटी बचाव बेटी पढाव,लैंगिक संवेदनशीलता, प्रजनन स्वास्थ्य,महिला सुरक्षा, महिला सशक्तिकरण,पॉश अधिनियम,कायदेशीर जनजागृती, पीसीपीएनडीटी अधिनियम,महिला व किशोरवयीन पोषण जागरूकता अशा विविध विषयांना समोर ठेवून हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले गेले. या अभियानात महिला, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, किशोरवयीन मुले, गरोदर माता या सर्वांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. हे अभियान राबवताना मुख्य मार्गदर्शन लाभले ते जिल्हा महिला बालविकास अधिकारी माननीय श्री. मनोज पाटणकर सर तसेच संरक्षण अधिकारी श्री.लहू पगडे सर, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक श्रीमती अश्विनी मोरे आणि सखी वन स्टॉप सेंटर चे सर्व कर्मचारी यांनी हे अभियान यशस्वीरिता पूर्ण केले.










