
मंडणगड : लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव. या विद्यालयातील 14 वर्षे मुले व 14 वर्षे मुली या दोन्ही संघांनी, तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या खेळात,' प्रथम क्रमांक ' पटकावला आहे. तसेच 17 वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. त्यांना क्रीडा शिक्षक श्री. मनोज चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.खेळामध्ये कोचचे महत्व खूप मोठे असते. खेळाडूंच्या शारीरिक, मानसिक, तांत्रिक आणि सामाजिक विकासामध्ये कोचची भूमिका महत्त्वाची ठरते. तो नियमांबरोबरच योग्य तंत्र, कौशल्ये, रणनीती शिकवतो. त्यामुळे खेळाडूचा खेळ अधिक दर्जेदार आणि परिणामकारक होतो.
योग्य सराव, व्यायाम, आहार आणि शिस्त याकडे त्यांनी लक्ष दिले. स्पर्धेत जिंकणे-हारणे नैसर्गिक असते. मात्र क्रीडा शिक्षक श्री.मनोज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन रुजवला .त्यामुळे खेळाडूंना विजयश्री खेचून आणता आला.
खेळाडूंच्या या नेत्रदीपक यशामुळे त्यांच्यावर मंडणगड तालुक्यातून ,तसेच दहागाव पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या उज्वल यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. 14 वर्षाखालील दोन्ही कबड्डी संघ जिल्हास्तरावर मंडणगड तालुक्याचे नेतृत्व करतील.










