
दापोली : दापोली विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय कदम यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करून आ. योगेश कदम यांना सहकार्य करणार असे जरी म्हटले असले तरी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नसल्याचे दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे एका गटाने दुसऱ्या गटातील कार्यकर्त्याला हाणामारी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने स्पष्ट झाले आहे.
याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पाजपंढरी गावातील शेतवाडी मंडळाचे अध्यक्ष गणेश जनार्दन चोगले यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी वाडीची एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत अध्यक्ष गणेश चोगले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार यांना मतदान करा असे उपस्थित लोकांना सांगितले असता नीलकंठ हिर्या रघुवीर यांनी आपले योगेश कदम यांच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांना आपण मतदान करणार असल्याचे बैठकीत सांगितले होते तेव्हा त्याला कोणी विरोध केला नाही. निवडणूक होऊन योगेश कदम आमदार होवून राज्यमंत्रीहि झाले. त्यानंतर ८ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता शेतवाडी मंडळाची सर्वसाधारण सभा चंद्रकांत रामा रघुवीर यांच्या घरासमोरील ओट्यावर झाली.
या सभेत मंडळाचे अध्यक्ष गणेश जनार्दन चोगले यांनी विधानसभा निवडणूक मतदानावर चर्चा सुरु केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला मते देण्याचे वाडीत ठरलेले असताना योगेश कदम यांच्या धनुष्य बाण या निवडणूक चिन्हाला १५० मते कशी मिळाली असे विचारले असता नीलकंठ रघुवीर यांनी मतदान कोणाला करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार असल्याने कोणी कोणाला मतदान केले हे आपणास माहित नाहि असे सांगितले. त्याचा राग मनात धरून संशयित गणेश जनार्दन चोगले यांनी नीलकंठ रघुवीर यांच्या शर्टची कॉलर धरून त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी रघुवीर यांचे भाऊ त्यांना वाचविण्यासाठी गेले असता त्यानाही मारहाण करून तुम्ही गावात राहायचे नाही, तुम्ही नाही ऐकलात त्तर तुम्हाला ठार मारून समुद्रात फेकून टाकू अशी धमकी दिल्याची तक्रार नीलकंठ हिर्या रघुवीर यांनी दिली असून या तक्रारीत त्यांनी संशयित गणेश जनार्दन चोगले, अनिल गोपाळ चोगले, जितेंद्र सखाराम चोगले, विष्णू बाळ्या तबीब, वामन चाया चोगले, किसन जनार्दन चोगले सर्व रा. पाजपंढरी, शेतवाडी यांची नावे दिली असून या सर्वाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक डी.डी. पवार करत आहेत.