
रत्नागिरी : जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या सोडतीत दापोली पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागासवर्ग, तर राजापूरचे नागरिकांचा मागासवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. तसेच चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरी या पंचायत समित्यांसाठी सर्वसाधारण, तर मंडणगड, संगमेश्वर, लांजा व खेड या समित्यांसाठी सर्वसाधारण महिला हा आरक्षण प्रवर्ग निश्चित करण्यात आला आहे.
ही सोडत अनन्या अक्षय उकीरडे हिच्या हस्ते पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तसेच तहसिलदार (सर्वसाधारण) मीनल दळवी यांची उपस्थिती होती. सोडतीच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे आरक्षण प्रक्रियेची माहिती दिली. त्यानंतर अनन्या उकीरडे हिने चिठ्ठ्या काढून सभापती पदाचे आरक्षण जाहीर केले.
या प्रक्रियेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना दिशा मिळणार असून विविध समाजघटकांना नेतृत्वाची संधी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.










