कोकण रेल्वेच्या टीसीची सतर्कता ; मुलाचे अपहरण वाचवण्यात यश

Edited by: मनोज पवार
Published on: September 30, 2025 14:59 PM
views 856  views

रत्नागिरी : दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याला रेल्वेतून पळवून घेऊन जाणाऱ्या एका इसमाला पकडण्यात व अपहरण वाचवण्यात कोकण रेल्वेच्या टीसीची सतर्कता व धैर्य कामी आले. सदर इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुलाला पालकांच्या सूपूर्द केले आहे. टीसी संदेश चव्हाण यांच्या या अतुलनीय कार्याबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाने त्यांचे विशेष कौतुक करून बक्षीस जाहीर केले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 27सप्टेंबरच्या दादर ते सावंतवाडी या ट्रेनमध्ये कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांना एक इसम एका लहान मुलाबरोबर आढळून आला. या इसमाने बरोबरच्या मुलाबरोबरचे वागणे टीसी चव्हाण आणि अन्य प्रवाशांनाही संशयित वाटले. संदेश चव्हाण यांना संशय आल्याने त्यांनी त्या इसमाची चौकशी सुरू केली. पण त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. यामुळे चव्हाण यांना हे मूल त्याचे नसून पळवून आणले आहे, हा संशय अधिक बळावला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संदेश चव्हाण यांनी त्या इसमाला धरून ठेवले. णि तात्काळ चालत्या ट्रेनमधूनच नियंत्रण कक्ष, वाडी बंदर लोहमार्ग मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलिस ठाणे यांना माहिती दिली.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक धुमाळे, वरिष्ट पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, सहाय्यक पोलिस निरीक्षक ताजने,आणि ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांनी संशयित इसम व त्याच्याकडील मुलाला ताब्यात घेतले. संशयीत आरोपी अमोल अनंत उदलकर (वय 42,राहणार इंदील देवगड) याला मुलासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करताच त्याने सदरचे मूल मुंबई केइम रुग्णालयातून पळवून आणल्याचे स्पष्ट झाले. सदर मुलाचे नाव आयुष अजयकुमार हरिजन (वय 2) असल्याचे स्पष्ट झाले. या बाळाची आई रुग्णालयात उपचार घेत असताना आजीकडे असलेल्या या मुलाचे सदर इसमाने अपहरण केले होते. सदर आरोपीला भुईवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेल्या मुलाला वाचवण्यात यश आल्याने टीसी संदेश चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोकण रेल्वेमध्ये आपले सेवा बजावताना दाखवलेल्या या सतर्कतेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनीही तात्काळ घेत चव्हाण यांचे विशेष कौतुक करत त्यांना पंधरा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे. संदेश चव्हाण यांना कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.