
गुहागर : गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी नाना फडणवीस सभागृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर प्राचार्य तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ समिती (CSS) सदस्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ समितीच्या सदस्यांना कार्यक्रमात विशेषतः आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या सखोल ज्ञानाचा आणि व्यावहारिक अनुभवाचा लाभ व्हावा हा यामागचा हेतू होता. या सदस्यांना दरवर्षी प्रत्येक सेमिस्टरला आमंत्रित करून विभागवार विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व बौद्धिक क्षितिज विस्तारास मोठी मदत होत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांचा लघुचित्रफित सादरीकरणही करण्यात आले.
विद्या प्रसारक मंडळ, ठाणेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना विद्यार्थ्यांना संदेश दिला की, “केवळ परीक्षार्थी विद्यार्थी न राहता सजग व सुजाण नागरिक बना.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवी दिशा मिळाली. कार्यक्रमात आजी माजी विद्यार्थी पालकांचे मनोगत हे विशेष आकर्षण ठरले. पालशेत येथील श्री. रवींद्र कानिटकर यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या जेष्ठ शास्त्रज्ञ समिती बद्दल गौरवोद्गार काढले तसेच यांच्या मुळे त्यांच्या मुलाला मिळालेल्या Placement संबंधी आवर्जून माहिती दिली. समारोपाच्या भागात आभार प्रदर्शनानंतर पसायदान सादर करण्यात आले. अखेरीस स्नेहभोजनाने या उत्साहपूर्ण समारंभाची सांगता झाली.