पोलीस निरिक्षकांकडून हॉटेल व्यवसाईकास चुकीच्या पध्दतीने मारहाण..?

Edited by:
Published on: September 12, 2025 18:32 PM
views 344  views

मंडणगड : मंडणगड येथील युवा हॉटेल व्यवसाईक आकाश चव्हाण ( वय २५) यास मंडणगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांनी पोलीस असल्याचा गैरफायदा घेऊन गुन्हे तपास कामातील एस.ओ.पी ला केराची टोपली दाखवून चुकीच्या पध्दतीने मारहाण करीत पुर्ण चव्हाण कुटुंबास गेल्या चार दिवसापासून लक्ष करून उध्दवस्थ करण्याची योजना आखल्याचा आरोप भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य केदार साठे यांनी भिंगळोली येथे पार्टीचे कार्यालयात आज आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.

या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण व जिल्हा संपर्क मंत्री नितेश राणे यांच्याकडे रितसर तक्रार केलेली असल्याचे सांगीतले या विषयसंदर्भात पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांची आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता कुठलेही समपर्क उत्तर न मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

पार्टीच्या वतीने मंडणगड पोलीस निरिक्षकांना त्यांचे पदावरुन तात्काळ बडतर्फ करुन मंडणगडमध्ये गेल्या चार दिवसापासून पोलीस स्थानकाकडून घडलेल्या प्रकारांची पुर्णपणे निष्पक्ष चौकशी  करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगीतले. या पत्रकार परिषदेस माजी तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, तालुका अध्यक्ष प्रविण कदम, श्रीराम इदाते व पार्टीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना साठे पुढे म्हणाले की युवा हॉटेल व्यवसाईक यांचे पुर्ण कुटुंबास पोलीसांनी टार्गेट केले आहे. गेल्या चार दिवसापांसून हॉटेलच्या कागद पत्रापासून विविध तपासण्या केल्या जात आहेत. या संदर्भात आकाश याचे विरोधात कोणतेही अधिकृत तक्रार पोलीस स्थानकात नोंद करण्यात आलेली नाही. तसेच त्याचे विरोधात यापुर्वीही कोणतीही तक्रार दाखल नाही असे असताना वारंवार चौकशी करण्यासाठी पोलीसांची गाडी हॉटेलवर पाठवून हॉटेल ग्राहकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्यात आले. गुन्ह्याचे तपासकामाचे संदर्भात तयार करण्यात आलेल्या पोलीस नियमावलीचा वापर न करता पोलीसी बळाचा वापर करुन अतिशय चुकीच्या पध्दतीने मंडणगड तालुक्यात सामाजीक चळवळीत कार्यरत असलेल्या प्रखर हिंदुत्ववादी कुटुंबास लक्ष करण्याची योजना आखल्यासारखेच दिसून आले आहे. याशिवाय आकाश यास चुकीच्या पध्दती पोलीस स्थानकात बोलावून मारहाण करण्यात आली आहे. कोणत्या कारणाने चौकशी व युवकास मारहाण केली त्याची समपर्क माहीती न मिळाल्याने पुर्ण कुटुंब दहशत व भितीच्या छायेखाली आहे. या संदर्भात पोलीस निरिक्षकांनी एक तासाच्या चर्चेत कोणेतही उत्तर न दिल्याने आज आपण वरिष्ठांकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी या करिता विद्यमान  पोलीस निरिक्षकांना तातडीने निलंबीत करा अशी मागणी केलेली असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.