राष्ट्र सेवा दल म्हणजे मानवता धर्माचा सेतू : डॉ. महेंद्र मोहन

अद्वैत फाऊंडेशन आयोजित व्यक्तिमत्व विकास शिबिराला उदंड प्रतिसाद
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 14, 2024 10:23 AM
views 147  views

कणकवली : सध्याच्या धार्मिक जातीय ध्रुवीकरणाने माणसा माणसांत भेद निर्माण करण्याचे घातक काम केले जात आहे.   धर्म पंथाच्या झेंड्याखाली माणूस विभागला जात असताना माणसा - माणसातील मानवता टिकवून ठेवणारा सेतू म्हणजे राष्ट्र सेवा दल होय असे प्रतिपादन वात्सल्य मंदिर ओणी चे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांनी केले. अद्वैत फाऊंडेशन कणकवली च्या वतीने गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास शिबिराचे उदघाटन डॉ. महेंद्र मोहन यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करून  करण्यात आले. साने गुरुजींच्या प्रतिमेला बाबासाहेब नदाफ यांच्या हस्ते, अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेला प्रा. डॉ. मुंबरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्र सेवा दल चे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ, अद्वैत फाऊंडेशन च्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, गोपुरी आश्रम चे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, भानू गोंडाळ, मालती गोंडाळ, हरिश्चंद्र सरमळकर, संगीता सरमळकर, विद्या राणे,अर्पिता मुंबरकर, मुख्य प्रशिक्षक चंदन माटुंगे, प्रशिक्षक सागर पाटील, राज कांबळे,विश्वास राशिवडे आदी उपस्थित होते.  यावेळी पुढे बोलताना डॉ. महेंद्र मोहन म्हणाले की, अद्वैत फाऊंडेशन च्या वतीने गोपुरी आश्रम येथे सलग 7 वर्षे व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित करण्यात येत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. 

राष्ट्र सेवा दल ही बिन भिंतीची शाळा आहे. या शाळेमध्ये लोकशाही समानता धर्मनिरपेक्ष वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वातंत्र्य समता आणि बंधुता यावर आधारित राष्ट्रवादाचे मूल्ये शिबीरार्थींवर रुजविण्याचे काम केले जाते. यातूनच भारताची उद्याची सजग नागरिकांची पिढी घडणार आहे असे बाबासाहेब नदाफ म्हणाले. प्रा. डॉ.मुंबरकर म्हणाले की गोपूरी आश्रमाच्या मामध्यमातून राष्ट्र सेवा दलाचा विचार तसेच महात्मा गांधी, आणि कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचे समानतेचे विचार नव्या पिढीसमोर देण्याचे काम आम्ही करत आहोत. प्रास्ताविक राजन चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन भानू गोंडाळ यांनी केले तर आभार विद्या राणे यांनी मानले.