
दोडामार्ग : खराडी नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्याच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे. या बंधाऱ्यातील अतिरिक्त पाणी तिलारी नदीत प्रवाहित होत आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना सावधानता बाळगावी व नदीपात्रात उतरू नये असा सतर्कतेचा इशारा तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. खराडी नदीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तेरवण मेढे येथील उन्नैयी बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे या बांधऱ्याचे दरवाजे उघडले आहेत त्यामुळे बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातून येणारे अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने खराडी नाल्यात सोडण्यात येत असून हे पाणी पुढे तिलारी नदीपात्रात प्रवाहित होत आहे.
तिलारी परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्र व खराडी नाल्यातील पाणी तिलारी नदीपात्रात येऊन पाणी पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच नदीपात्रातील कोजवे वरून देखील पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढवू शकत असल्याने जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरू नये. रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदीपत्रातून ये-जा करू नये. कपडे धुण्यासाठी महिलांनी पाण्यात जावु नये. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी गुरांना नदीपत्रात सोडू नये. गाव पातळीवरून गावात दवंडी पेटवून सतर्कतेचा इशारा द्यावा व सर्वांनी सावधानता बाळगावी असा इशारा तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.