सावंतवाडीत रंगली गोव्याचे गायक सुभाष परमार यांची मैफल !

नवरंग व सावंतवाडी नगरपरिषदेचं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: October 27, 2022 14:55 PM
views 160  views

सावंतवाडी : नवरंगच्यावतीने आयोजित 'पाडवा पहाट' ची पहाट गोव्याचे गायक कलाकार सुभाष परवार यांच्या सुमधुर गायनाने असंख्य संगीतप्रेमींच्या उपस्थितीत सजली. एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून त्यांनी  कार्यक्रमात रंगत आणली.

दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षी नवरंगच्यावतीने व सावंतवाडी नगरपरिषदेच्या सौजन्याने पाडवा पहाट' हा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला जातो. कार्यक्रमाचे यंदाचे हे सतरावे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी दिवाळी पाडव्याच्या दिवशी मोती तलावाच्या काठी संगीतमय वातावरणात असंख्य संगीतप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी व्यासपीठावर नवरंगचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर, मंजिरी धोपेश्वरकर, गायक सुभाष परवार, संदगुरु संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री, दिनकर परब, सुरेश मेस्त्री, बाळ पुराणिक, किशोर सावंत. निरज भोसले, शौनक चारी, गीतेश कांबळी आदी उपस्थित होते.

यावर्षी नवरंगच्यावतीने गायक गोव्याचे कलाकार सुभाष परवार यांना आमंत्रित करण्यात आली होते. पंडित राजा काळे यांचे शिष्य असून आतापर्यंत त्यांनी गोवा आणि महाराष्ट्रात अनेक मैफिली गाजवल्या आहेत. सुभाष परवार यांचा शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्रीपाद चोडणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इतर मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

सुभाष परवार यांनी आपल्या गायनाची सुरुवात नट भैरव रागातील गुंज रही किरात तुम्हरी या गाण्याने केली. त्यानंतर साईसे लगन कठीण है भाई, दिवे लागले रे, नभास या आले पर आदी एकापेक्षा एक गाणी सादर केली. त्यानंतर त्यांनी त्या दिसा वडा कडेन गडद तिनसना हे कोकणी गीत गाऊन कार्यक्रमात खूपच रंगत आणली. त्यानंतर जय शंकरा गंगाधरा, हरी भजनाविन काळ घालवू नको रे, सुरत पिया की न छिन बिसराये आदी भक्तीगीत तसेच नाट्यगीत सादर केली.

परब्रम्ह भेटी लागी ही भैरवी गाऊन त्यांनी पाडवा पहाट कार्यक्रमाची सांगता केली. त्यांच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सुभाष परवार यांना  हार्मोनियम साथ निलेश मेस्त्री, तबला साथ किशोर सावंत व निरज भोसले व तानपुऱ्यावर शौनक चारी व गीतेश कांबळी यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सुमधुर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळ पुराणिक यांनी केले.