बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये रानभाजी महोत्सव !

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 14, 2023 12:29 PM
views 332  views

कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये दिनांक 12 ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला.


याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व ज्येष्ठ वैज्ञानिक श्री. भास्कर काजरेकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निसर्ग संपन्न सिंधुदुर्ग पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. आपल्या आहारात रानभाज्यांचा समावेश केला जातो. त्याचे महत्त्व नवीन पिढीला समजून येईल. या भाज्यांचे विविध प्रकार नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. असा आहार विविध रोगापासून सुरक्षितता देतो. विशेषतः माता पालकांनी जर रानभाज्यांचे विविध पदार्थ मुलांना खाऊ घातले, तर पोषक तत्वे आपोआपच मिळतील व सुदृढ पिढी निर्माण होईल असे मत श्री काजरेकर सरांनी आपल्या वक्तव्यातून मांडले. शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारंगी, अळू, गोटाची वेल, पेवगा, कुडा शेंग, खारशिंग इत्यादी भाज्या आणून त्यांची सुंदर प्रकारे मांडणी केली व सादरीकरण केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे माता पालक रानभाजी पासून बनवण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अळूवडी, अळूचे फतफते, अळंबी, बांबूची भाजी इत्यादी पाककृती मांडण्यात आले.


पाककला स्पर्धेमध्ये रमा वाळके प्रथम क्रमांक (बांबूच्या कोंबाची भाजी, एक पानी भाजी), द्वितीय क्रमांक आराध्या पेडणेकर (मशरूम स्टफ अळूचे फतफते), तृतीय क्रमांक आर्या साटम (टाकळा कटलेट), प्रथम उत्तेजनार्थ स्वप्नाली पारधी (अळूवडी), द्वितीय उत्तेजनार्थ सीमा कुंभार (अळूची फोडणी भाजी) अशाप्रकारे निवड करण्यात आली. पाककला स्पर्धेचे परीक्षण अमित टकले, स्नेह इन्स्टिट्यूट व पाताडे मॅडम छत्रपती कृषी महाविद्यालय, ओरस, प्राध्यापिका यांनी केले.


याप्रसंगी संस्थेच्या सचिव  सुलेखा राणे संस्था सदस्य संदीप सावंत संस्थेच्या समन्वयक प्रणाली सावंत कृषी विज्ञान केंद्र प्राध्यापिका तावडे मॅडम, परशुराम झगडे , केंद्रप्रमुख श्री.पवार सर, शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

सर्व रानभाज्या पाककला स्पर्धेच्या यशस्वी पालकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अश्विनी जाधव व इयत्ता नववी ची विद्यार्थिनी रितिका खापेकर यांनी केले.