रमाई नदी घेणार मोकळा श्वास

वैभव नाईकांनी उपलब्ध केला निधी ; ग्रामस्थांनी मानले आभार
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 29, 2023 11:18 AM
views 248  views

मालवण : मालवण मसुरे येथील रमाई नदीतील गाळ काढण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रमाई नदी लवकरच गाळ मुक्त होईल असा विश्वास व्यक्त करत या कामासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या आमदार वैभव नाईक यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.  

मालवण मसुरे येथील रमाई नदीचा गाळ काढण्याबाबत स्थानिक ग्रामस्थ अनेक वर्षे प्रशासनाकडे मागणी करत होते. ग्रामस्थांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधीची तरतूद केली. त्यानुसार मागील वर्षे सदर कामास सुरुवात होऊन पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच रमाई नदी गाळ मुक्त होणार आहे. या कामाबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत. 

यावेळी मसुरे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच नरेंद्र सावंत, छोटू ठाकूर, पिंट्या गावकर, जगदीश चव्हाण, रामराज सावंत, अशोक मसुरकर, रमेश पाताडे, साई बागवे, सत्यविजय भोगले, वैभव मसुरकर, विनायक चव्हाण, राघवेंद्र मुळीक, अमित बागवे, गोलतकर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.