रवींद्र चव्हाणांवरील टीका सहन करणार नाही

भाजपच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षांचा इशारा
Edited by: मनोज पवार
Published on: August 20, 2024 09:41 AM
views 298  views

दापोली :  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे आमचे नेते आहेत आणि त्यांचेवर केलेली टीका आम्ही कदापि सहन करणार नाही. अशी भूमिका भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.  

रामदास भाई भाजप नेत्यांची बदनामी करण्याचे आता बंद करा असे असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी माजी मंत्री रामदास कदम यांना ठणकावले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार सूर्यकांत दळवी, अक्षय फाटक, भाऊ ईदाते, नगरसेविका जया साळवी, तालुकाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष संदीप केळकर आदी उपस्थित होते.

कुठला तरी विषय कुठेतरी नेऊन, त्या बाबत गळे काढायचे या बाबत आता भारतीय जनता पार्टी गप्प बसणार नाही. खरतर रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच कौतुक करायला हवं,कारण या मुंबई गोवा हायवेसाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहे. जो चांगलं काम करतोय त्यांना चांगलं म्हणण्याची दानत तुमच्याकडे नाही. माझ्या शिवाय कोणीही चांगला नाही, माझ्या शिवाय कोणीही चांगलं काम करत नाही,आणि माझ्या मुलाशिवाय दुसरा कोणीही नको ही मानसिकता रामदास कदम यांची आहे असे साठे म्हणाले. रामदास भाई आता हे धंदे बंद करा. कारण सोईच्या वेळेला तुम्हाला देवेंद्र फडणवीस आठवतात आणि बाकीच्या वेळी मी कसा मोठा? हे आता चालणार नाही.असा ही निर्वाणीचा सल्ला कदम यांना साठे यांनी दिला आहे.

२०१४ ला रामदास कदम यांनी अनंत गीते यांना पाडण्याचा प्रयत्न केला. रायगड मतदारसंघात धैर्यशील पाटील खासदार होऊ नयेत म्हणून यांनी जंगजंग पछाडले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुलगा उभा राहिला तेव्हा त्यांना मच्छिमार बांधव संकटात आहेत हे आठवलं मग २०१४ पासून तुम्ही मंत्री होतात तेव्हा त्यांची व्यथा का आठवली नाही असा सवाल देखील साठे यांनी या वेळी उपस्थित केला. त्यामुळे मुलाच्या  व्यतिरिक्त रामदास कदम यांना काहीच सुचत नाही. म्हणे लाडकी बहीण या योजनेचे पैसे योगेश कदम यांचेमुळे आले, अरे ज्या मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी जी योजना आणली त्यांचे तरी नाव घ्या असा खोचक टोला ही साठे यांनी लगावला. 

रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना ते या खात्याचे मंत्री म्हणून कुचकामी आहेत त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा असे म्हटल्यावर दापोली भाजपमध्ये खळबळ उडाली होती व त्यानंतर लगेचच भाजपच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेवून रामदास कदम यांचेवर टीकेची तोफ डागली. या सर्व प्रकारामुळे दापोली विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या या दोन राजकीय पक्षांमध्ये आलबेल नाही हे दिसून आले आहे.