
दोडामार्ग : हिंदूंवर होणारे अत्याचार, दोडामार्ग तालुक्यातून होणारी गोमांवस वाहतूक ही पूर्णपणे थांबावी व हिंदूंसाठी दिवस रात्र न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून केलेले गुन्हे यांच्या निषेधार्थ दोडामार्गमध्ये हिंदुरक्षा महासमिती मार्फत शनिवारी 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता महारॅली होणार आहे. या रॅलीत सर्व दोडामार्ग वासीय व जिल्ह्यातील इतर संघटनांनी सामील होऊन हिंदूंवरील अन्याय थांबविण्यासाठी एकत्र येऊन मोठ्या संखेने रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन हिंदुरक्षा समिती मार्फत पत्रकार परिषद घेऊन करण्यात आले आहे.
याबाबत हिंदू रक्षा महासमितीच्यावतीने गणेश गावडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन रॅली बाबत माहिती देण्यात आली.
गावडे म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यात काही दिवसापूर्वी जी घटना घडली त्या प्रकरणात दुर्दैवाने आमचे हिंदुत्ववादी संघटनेचे काही कार्यकर्ते गेली सोळा दिवस तुरुंगवास भोगत आहेत. आतापर्यंत इथल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जे सहकार्य केलं असे सहकार्य राज्यभरामध्ये कुठेही दिसून येत नाही. अस काय घडलं की, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर भयंकर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली. याचा संपूर्ण तपास मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन करणार आहोत.
कर्नाटक राज्यातून दोडामार्गमार्गे गोमांसची तस्करी होत असेल तर याची खबरदारी घेण्याचं काम प्रशासनाचं होत, पोलिस यंत्रणेच होत. तरीही गो मांस तस्करी अनेकवेळा आपल्या तालुक्यातून होत असल्याचं दिसत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर झालेले हे आरोप, गुन्हे याचा जाहीर निषेध करतो. ज्या सोळा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हिंदू धर्म रक्षणासाठी आपल्या स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले त्यांचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो आहे. देशात जर काही चुकीचं घडत असेल आणि त्याबाबतची पोलिसांना सूचना देऊन सुद्धा थांबत नसेल तर यापुढे रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी तमाम हिंदू बांधवांची राहील.
हिंदू रक्षा समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांना भेटून हिंदू धर्मविरोधात चाललेल्या सर्व प्रकरणांची यादी त्यांच्याकडे सादर करणार आहोत. हिंदू राष्ट्राकडे जर कोणी खेळ करत असेल ते आम्हीं कदापीही सहन करणार नाही. हिंदू एकता रॅलीचे आयोजन करण्यात आलं त्यामध्ये हिंदू धर्माशी निघडीत असलेली सर्व संघटना, सामाजिक संस्था, संप्रदाय, मंदिर समित्या, कला- क्रीडा सांस्कृतिक मंडळे, युवाशक्ती, मातृशक्ती आदी सर्व हिंदू बांधवांनी या रॅलीत सहभागी होऊन हिंदू एकतेची ताकद दाखविली पाहिजे. ही रॅली राष्ट्रोळी मंदिर सावंतवाडा ते दोडामार्ग मुख्य चौक अशी काढली जाणार आहे.










