
सावंतवाडी : पवनार-पत्रादेवी हा ८०२ किमी. शक्तिपीठ महामार्ग केवळ गोव्यात मिळणारी स्वस्तातील दारू महाराष्ट्रात नेण्यासाठी तसेच अदानी नावाच्या राक्षसाला तिकडचे खनिज गोव्यातील बंदरावर आणण्यासाठी असून हा महामार्ग झाल्यास कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास होणार आहे. ५५ हजार शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरविणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी सरकारला दे असे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी श्री पत्रादेवी चरणी घातले.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र-गोवा श्री पत्रादेवी देवस्थानास भेट दिली. यावेळी सर्व देवस्थान वंदनीयच आहेत. मात्र, पत्रादेवी देवस्थानाचे महात्म्य स्थानिकांना कळलं नाही. पण, ते नागपूरात बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांना समजलं असा टोला त्यांनी यावेळी हाणला. २७ हजार एकर जमीन खरेदी करून ५५ हजार शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरविला जाणार आहे. यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हयात महापुराची समस्या उद्भवेल असं मत त्यांनी व्यक्त केल. शक्तिपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी पत्रादेवी चरणी गाऱ्हाणे घालण्यात आले. हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे, यासाठी सर्वांनी मिळून लढा दिला पाहिजे असे यावेळी स्पष्ट केले.
यावेळी कॉ. संपत देसाई, शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, माजी आरोग्य सभापती संग्रामसिंग कुपेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेसचे विद्याधर गुरबे, मनसेचे नागेश चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांनवर, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, नंदू नाडकर्णी, ज्ञानेश्वर येडवे, प्रशांत पांगम, संदीप सावंत, शब्बीर मणियार, माजी उपसभापती चंद्रकांत कासार यांच्यासह शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.