प्रिंदावण मानवाडीच्या सड्यावर रानगवा मृतावस्थेत !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 13, 2025 14:07 PM
views 244  views

राजापूर : राजापूर तालुक्यातील प्रिंदावण मानवाडी येथील सड्यावर शुक्रवार दिनांक ११ जुलै २०२५ रोजी मृतावस्थेत असलेला वन्यप्राणी रानगवा आढळुन आला असुन, याबाबतची माहिती मिळताच राजापूर वनविभागाने घटनास्थळी धाव घेत विल्हेवाट लावली असल्याची माहिती राजापूरचे वनपाल जयराम बावधाने यानी दिली आहे . 

शुक्रवार दिनांक 11/07/2025 रोजी राजापूर तालुक्यातील मौजे प्रिंदावन येथील मानवाडी साड्यावरती वन्यप्राणी रानगवा मृत आढळून आल्याचे प्रिंदावन गावाचे ग्रामस्थ डॉ.घाटे यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनी वरून कळविले होते . त्यानंतर राजापूरचे वनपाल जयराम बावधाने यानी  सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत  वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व  रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्याठिकाणी वन्यप्राणी रानगवा मृत अवस्थेत असल्याचे दिसुन आले . सदर रानगव्याची पाहणी वनाधिकाऱ्यानी  केली असता, तो नर जातीचा असून त्याचे वय साधारण  ११ ते १२ वर्ष असल्याचे स्पष्ट केले आहे . 

प्रिंदावण मानवाडी येथे आढळुन आलेल्या मृत रानगव्याची  शिकार किंवा विषबाधा  झाली आहे काय याची खात्री पशुधन विकास अधिकारी राजापुर  व वन अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केली व पशुधन विकास अधिकारी राजापूर  श्री.चोपडे यांचे मार्फत शवविच्छेदन केले. सदर रानगव्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे . त्यानंतर  विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई  व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांका लगड  यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मृत रानगव्यास लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट करण्यात आल्याची माहिती राजापूरचे वनपाल बावधाने यानी दिली आहे .  सदर कामगिरीसाठी रत्नागिरी , वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार , वनपाल राजापूर  जयराम बावदाणे  , वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार व रेस्क्यू टीमचे नितेश गुरव, सत्यवान तळवडेकर, रमेश बिर्जे तसेच अक्षय गुरव, पांडुरंग गोंडाळ, प्रशांत राऊत उपस्थित होते अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६  किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरिजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.