
वेंगुर्ला : गेली सव्वा दोन वर्षे महायुतीची सत्ता राज्यात व या मतदार संघात असून राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यामुळे सध्या ते "कोणतेही पद नसताना मी केलेली विकासकामे" या हेड खाली काही विकास कामे प्रसिद्ध करत आहेत. हा प्रकार हास्यास्पद व बालिशपणाचा असल्याची प्रतिक्रिया भाजप मंडळ अध्यक्ष सुहास गवंडळर यांनी दिली आहे.
सुहास गवंडळकर म्हणाले, मागील सव्वा दोन वर्षात या मतदार संघातील झालेली कामे ही महायुतीचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आलेल्या निधीतून झाली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती मधून या विधानसभेत अनेक विकास कामे आणली गेली आणि त्याचे श्रेय पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनाच जाते त्याचबरोबर आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या मतदारसंघात अनेक विकास कामे आली यात 25 -15, जिल्हा नियोजन, ग्रामविकास अशा विविध हेडखाली ही विकास कामे देण्यात आली. त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक विकास कामे झाली आणि याचे फुकाचे श्रेय घेण्याचे काम आता राजन तेली करत आहेत.
विधानसभा प्रमुख म्हणून या विधानसभेची जबाबदारी ही राजन तेली यांच्याकडे होती त्यामुळे या संपूर्ण कामांची माहिती त्यांना होती. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामाचे श्रेय भाजप पक्ष सोडुन गेलेल्या व भाजप पक्षाने वेळोवेळी उपकार केलेल्या राजन तेली यांनी घेऊ नये अशी टीकाही सुहास गवंडळकर यांनी केली.