तेलींकडून पक्षश्रेष्ठी 'हिटविकेट' !

केसरकरांविरोधात ठेवला स्टेटस
Edited by: विनायक गांवस
Published on: October 10, 2024 07:17 AM
views 384  views

सावंतवाडी : महायुती भक्कम आहे, अभेद्य आहे अशा बाता राज्यात केल्या जातात. मात्र, महायुतीत सर्वकाही आलबेल नाही हे वारंवार पहायला मिळत आहे. सावंतवाडी विधानसभेत केसरकर विरूद्ध तेली हा संघर्ष वारंवार दिसून येत आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतरही तेली काही मागे हटायच नाव घेत नाही आहेत. त्यामुळे राजन तेली महायुतीच्या नेत्यांनाच हिटविकेट करत असल्याचे बोलले जात आहे. 

लोकसभा निवडणूकीत देखील राजन तेली यांनी स्टेटस ठेवला होता. नारायण राणे यांनी देखील तेलींच्या स्टेटसवर परखड भाष्य केलं होतं. नुकतंच भाजपच्या वरिष्ठांनी महायुती म्हणून आपण एकत्र आहोत. विरोधकांवर तुटून पडा पण, हिटविकेट होऊ नका असं आवाहन खुद्द भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल होत. तर पुणे येथील अधिवेशनात अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील व महायुतीच्या साथीनं लढायच आहे असा आदेश दिला. आज राजन तेलींच्या समक्ष पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याचा पुनरुच्चार केला. यानंतर अवघ्या काही तासांत माजी आमदार व सावंतवाडीतून इच्छुकांमध्ये आघाडीवर असणारे राजन तेली यांनी स्टेटस ठेवला. यात त्यांनी म्हटले आहे की, ''भाई, उठा उठा निवडणूक आली, खोटी आश्वासन दयायची वेळ झाली.

आता बदल हवा.. तर आमदार नवा...!

आता बदल हवा.. तर आमदार नवा...!'' असा हा स्टेटस आहे. हॅशटॅग सावंतवाडी विधानसभा असही यावर लिहीलं आहे. तेलींच्या या स्टेट्समुळे भाजपसह महायुतीचे पक्षश्रेष्ठी हिटविकेट होत असल्याची चर्चा आहे. इतकं असूनही महायुतीचे तिकीट मंत्री दीपक केसरकर यांना जाहीर झाल्यास माजी आमदार राजन तेली कोणता निर्णय घेणार याकडे देखील राजकीय वर्तुळाच लक्ष लागलं असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.