राजन तेलींनी स्वार्थी राजकारण थांबवाव : अशोक दळवी

गुडग्याला बाशिंग बांधुन मंत्री केसरकरांवर टिका करु नये
Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 18:52 PM
views 157  views

सावंतवाडी : राजन तेली यांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणात भाजप पक्षास वेठीस धरून भाजपाचा बळी थांबवावा व युतीधर्म पाळावा. उगाच गावोगाव फिरून स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा व त्यासाठी दीपक केसरकर यांच्यावर उठसुट टिका करण्यापेक्षा स्वतःच्या कार्यक्षेत्रात कणकवली येथील जनतेसाठी, युवकांसाठी स्वतः काय केले याचे आत्मपरिक्षण करावे असा पलटवार शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी लगावला आहे.

राजन तेली यांनी वास्तवाचे भान ठेऊनच वक्तव्ये करावीत. उगाच बेरोजगांची किंवा व्यवसायिकांची माथी भडकतील अशी निरर्थक वक्तव्ये करु नयेत. आपण आपले प्रयत्न अपुरे पडले अशी कबुली दिली. परंतु आपण कधीही प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. फक्त दिपक केसरकरांवर नाहक टिका करत राहणे हा आपला उद्योग आहे. लॉंगमार्च, आंदोलन हे आपल्याच अपयशाचे प्रतीक आहे. सावंतवाडी मतदार संघातून दोनदा जनतेने नाकारलेले तसेच भाजप पक्षात ही कोणी विचारत नसल्याने आलेल्या नैराश्यातून राजन तेली हे सध्या गावोगाव फिरून जनतेला भडकवण्याचे काम करत आहे. पण सावंतवाडी मतदार संघातील जनता सुज्ञ असल्यानेच राजन तेली यांची खेळी त्यांच्यावरच उलटत आहे. याचे प्रत्यक्ष उदा. म्हणजे आठ दिवसापुर्वी हत्ती हटाव मोर्चा ज्यामध्ये त्यांचा साधा फोन देखील वनमंत्र्यांनी उचलला नाही, तसेच जे दिपक केसरकर यांनी शासनाच्या माध्यमातून स्वतः लक्ष घालून प्रश्न सोडविले त्याचे श्रेय मात्र आपण घेतात. उदाहण द्यायचे झाले तर आंबोली येथील कबुलायतदार यांचा प्रश्न दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सुटला याचे श्रेय लाटण्यासाठी आपण पेढेही वाटले व पुन्हा प्रश्न रेंगाळला म्हणुन दिपक केसरकर यांच्यावर टिकाही केली हे दुटप्पी वागणे जनतेला ज्ञात आहे व फुक्याचे श्रेय घेण्याचा आपला केविलवाणा प्रयत्न हास्यास्पद आहे.

यावरुन राजन तेली लोकांचे काय प्रश्न सोडवणार हे सर्वसामान्य जनतेला ज्ञात आहे. त्यांनी कोणताही प्रश्न आजपर्यंत सोडविलेला नाही, तरी राजन तेली आपण यापुढे स्वतःचे आत्मपरीक्षण करावे उगाच गुडग्याला बाशिंग बांधुन दीपक केसरकर यांच्यावर कोणत्याही प्रकारची टिका करु नये असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. निता कविटकर, सावंतवाडी शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे यांनी दिला. अन्यथा आम्हालाही युतीधर्म पाळणे कठीण जाईल. आडाळी असो अथवा अन्य प्रश्न हे दिपक केसरकर यांच्या माध्यमातूनच व शासनस्तरावर सुटणारे प्रश्न हे मंत्री केसरकर व शासन मार्गी लावेल. आपण नक्की जर भाजपात असाल? तर यापुढे मित्रपक्षाचा युती धर्म पाळावा अस टिकास्त्र सोडले आहे.