
कणकवली : माजी आमदार राजन तेली यांनी सोमवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेद्वारे जिल्हा बँकेवर आरोप केलेत. जिल्हा बँकेकडून चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केले जात आहे. या प्रकाराला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच काही संचालक जबाबदार आहेत. या सर्व दोषींची चौकशी करून कारवाई केली जावी, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे करणार असल्याचा इशाराही तेली यांनी दिला.
आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत तेली म्हणाले, श्रीपाद महाजन नावाच्या एका व्यक्तीला जिल्हा बँकेने ५९ कोटींचे कर्ज दिले आहे. हे कर्ज शेतमांगर व ३.३१ हेक्टर जागेवर दिले आहे. १० कोटीचे खरेदीखत असून सदर मिळकतीचे मूल्यांकन ८८ लाख रुपये आहे. असे असतानाही जिल्हा बँक ५९ कोटींचे कर्ज कसे दिले? बँकेने हा घोटाळा केला असल्याचा आरोप तेली यांनी केला.
कर्ज देण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून दबंग शाही सुरू आहे. चुकीच्या मार्गाने कर्ज दिली जात आहेत. जे घोटाळे केले जात आहेत, त्याचे मुख्य सूत्रधार जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आणि त्यांची टीम आहे. जिल्हा बँकेची बॉडी बरखास्त करा आणि दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मी राज्याच्या दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्र्यांकडे केली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी भेटणार आहे, असेही तेली म्हणाले.
याबाबत मी नाबार्ड, सहकार आयुक्त यांच्याशीही संपर्क साधून मी केलेल्या तक्रारीचे उत्तर मागितले. मात्र त्यांनी माझी तक्रार जिल्हा बँकेकडे पाठवली व जिल्हा बँकेने केलेला खुलासा मला उत्तर म्हणून पाठवला. त्यामुळे घडत असलेल्या प्रकाराबाबत मी पोलिसांकडे ही तक्रार करणार आहे. पोलिसांनी दखल घेतली नाही तर मी उच्च न्यायालयात जाणार आहे. त्यामध्ये नाबार्ड, सहकार आयुक्त यांनाही पार्टी करणार असल्याचा इशारा तेली यांनी दिला.
राजन तेली यांच्या विधानामुळे जिल्हा बँकेची बदनामी होत असल्याचे विधान आमदार दीपक केसरकर यांनी केले होते, त्याविषयी विचारले असता तेली म्हणाले, दीपक केसरकर हवेत असतात. त्यांना या गोष्टीची कल्पना नसते. ते कोणाशी वाकडीक घेत नाहीत आणि मी कोणाला घाबरत नाही. वास्तविक घडला प्रकार भोगवे गावातील असून ते गाव दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात येते. केसरकर यांनी तेथे स्थानिक ग्रामसेवकाकडून याविषयी माहिती घ्यावी, असेही तेली म्हणाले.










