
सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी भाजपला रामराम करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवरील प्रवेशानंतर त्यांचे स्वागत सावंतवाडी शाखेत करण्यात आले. मात्र, यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांची अनुपस्थिती पहायला मिळाली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रूपेश राऊळ यांचा फोन 'नॉट रिचेबल' आला.
माजी आमदार राजन तेली यांच्या स्वागत सोहळ्यात उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, नेते बाळा गावडे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. आयात उमेदवार नको अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणाऱ्यांपैकी श्री. राऊळ होते. त्यात महाविकास आघाडीकडून राजन तेली यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे समोर येत असून प्रथमच शाखेत आलेल्या तेलींच्या स्वागतास श्री. राऊळ व गावडे अनुपस्थित राहील्याने ते नाराज असल्याच बोललं जातं आहे.
रूपेश राऊळ नाराज नसून महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. सोमवारपासून ते आमच्या सोबत असतील. ते आमच्या संपर्कात आहे. तसेच बाळा गावडे देखील आमच्यासह दिसतील. नाराजीचा कोणाचाही विषय येत नाही असं मत उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी व्यक्त केले. नाराजी बद्दल विचारले असता त्यांनी खुलासा केला.दरम्यान, रूपेश राऊळ यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल आला. त्यामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी असल्याच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. वरिष्ठांकडून विश्वासात न घेता प्रवेशासह उमेदवारीचा निर्णय घेतल्याने पक्षफुटीनंतर गद्दारी न करता निष्ठेला प्राधान्य देणारे शिवसैनिक नाराज असल्याचे काहींनी खासगीत बोलून दाखवले.