
सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी भाजपची साथ सोडत हाती शिवबंधन बांधल आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधण्यात आले. माजी आमदार राजन तेली यांच्याप्रमाणे इतरही कार्यकर्ते शिवसेनेत परत येतील असा विश्वास ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला सावंतवाडी मतदार संघात धक्का बसला आहे. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे, आ. अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
राजन तेली मातोश्रीवर गेल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार तेच असतील अशी चर्चा आहे. तिकीट न मिळाल्यास तेली काय निर्णय घेणार ? हे देखील महत्वाचे ठरणार असून २०१४ ची पुनरावृत्ती तर होणार नाही ना याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्चना घारे-परब यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कॉग्रेसकडून देखील दावा कायम आहे. त्यात आयात उमेदवार नको ! अशी भुमिका घेणारे ठाकरेंचे सैनिक कोणती भूमिका घेतात हे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. तेलींच्या मातोश्री प्रवेशानंतर महाविकास आघाडीतला तिढा सुटणार की गुंता अजुन वाढणार ? हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.