२०१४ ची पुनरावृत्ती, राणेंवर टीका करत तेलींनी सोडलं 'कमळ'

Edited by: विनायक गांवस
Published on: October 18, 2024 05:19 AM
views 1469  views

सावंतवाडी : २०१४ ला नारायण राणे यांचे राईट हॅंण्ड असणारे माजी आमदार राजन तेली यांनी राणेंची साथ सोडून कॉग्रेसला रामराम केला होता. राष्ट्रवादी प्रवेश करून तिकीट न मिळाल्याने त्यांनी भाजपातर्फे निवडणूक लढवली होती. २०१९ च्या विधानसभेआधी  राणे भाजपात आले. अन् २०२४ च्या विधानसभेला पुन्हा १० वर्षांपुर्वीची पुनरावृत्ती झाली. राणे कुटुंबियाकडून आमचे खच्चीकरण करण्याचे तसेच त्यांच्यापासून दूर गेलेल्या सर्वांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहेत. एकाच कुटुंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणारा तिसरा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही, ही घराणेशाही मला मान्य नाही असं सांगत राजन तेलींनी भाजपच कमळ सोडून मातोश्रीवर दाखल होऊन हाती मशाल घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

राजन तेली यांनी म्हटले आहे की, मी गेली 10 वर्षे आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे दिवसरात्र मेहनत करून सर्वाना बरोबर घेऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आपण सर्वांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केले. 2019 ला कणकवली विधानसभेमध्ये शिवसेनेचे सतीश सावंत यांना शिवसेनेने अधिकृत उमेदवारी देवून आपल्या भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे केले म्हणून मला AB फॉर्म दिला होता परंतू तत्कालीन भाजपा अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, रविंद्र चव्हाण, संघटनमंत्री सतीश धोंड यांच्याकडून निरोप आला की शिवसेनेकडून चूक झाली असेल तरी त्यावेळी आपण चुक करता कामा नये म्हणून मी AB फॉर्म पक्ष नेतृत्वाच्या आदेशामूळे दिला नाही.

त्याचप्रमाणे भाजपा पक्षात प्रवेश केलेल्या राणे कुटूंबियांचा अंतर्गत होत असलेला त्रास तसेच सिंधुदूर्ग जिल्हा बँक 2019 वी विधानसभा निवडणूक यामध्ये माझा पराभव करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक निर्माण करणे (यासाठी साम दाम, दंड, भेद यांचा वापर करणे) पूर्वीच्या या सर्व त्रासाला कंटाळून मी भाजप पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना वाढीसाठी काम केले. फक्त बांदा शहरापुरती मर्यादित असलेली भाजपा संपूर्ण सावंतवाडी मतदार संघात वाढविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन अतोनात परिश्रम केले. परंतू पुन्हा राणे कुटूंबिय भाजपा पक्षात दाखल होवून आमचे खच्चीकरण करण्याचे तसेच त्यांच्यापासून दूर गेलेल्या सर्वांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहेत. मी घोटगे सारख्या अत्यंत ग्रामीण भागात सामान्य कुटूंबात जन्मलो. कष्टाने माझी राजकीय कारकिर्द घडवली. ज्या राजकीय पक्षात गेलो, तिथे 100% प्रामाणिकपणे काम केले, स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली. पण एकाच कुटूंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणारा तिसरा विधानसभा मतदारसंघात उमेद्वारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही.याबाबत सातत्याने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेले होते. त्याबाबत अदयाप कोणतीही कार्यवाही झालेली नाही यामध्ये वरिष्ठांचा नाइलाजही असू शकतो हे मी समजू शकतो. गेल्या 10 वर्षात तुम्ही सर्वांनी भरपूर प्रेम दिलं त्याबददल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. आपण केलेल्या सहकार्याबददल मी आपला आभारी आहे. तरी माझा भाजपा प्राथमिक सदस्य तसेच भाजपा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा मंजूर करावा अशी विनंती त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

राजन तेलींच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा २०१४ ची पुनरावृत्ती झाली आहे. थेट राणेंवर आरोप करत भाजपला रामराम केल्यान जिल्ह्यातील राजकारण कोणती दिशा घेत हे महत्त्वाचे ठरणार आहे. राजन तेली यांच्यासह कितीजण कमळाची साथ सोडून ठाकरेंच्या सेनेत जातात ? की भाजप आणि राणेंसोबत राहतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच राजन तेली यांना ऐनवेळी प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केल्यास आयात उमेदवार नको अशी भुमिका घेणारे ठाकरेंचे सैनिक काय करणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.