नितेश राणेंच्या सांगण्याने राज ठाकरे निर्णय घेत नाहीत | उपरकरांचा नितेश राणे यांना टोला !

आम्हाला सल्ले देण्यापेक्षा आम्ही आपल्या वडीलांना वेळोवेळी दिलेले सल्ले जाणून घ्या : उपरकर
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 15, 2022 16:02 PM
views 341  views

कणकवली  : माझे मनसेतील पक्षीय पद टिकवण्याबद्दल सल्ला देण्यापेक्षा आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या वडिलांना आम्ही वेळोवेळी दिलेले सल्ले जाणून घ्यावेत, असा प्रतिटोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आमदार नितेश राणेंना लगावला. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे माजी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.

उपरकर म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे. विधानसभा निवडणुकीतही नितेश राणे मतदारांना मतांसाठी असेच धमकावणार काय ? नितेश राणेंनी स्वतःचे वडील जेव्हा प्रथम आमदार झाले तेव्हा राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, हे आधी लक्षात घ्यावे. मग तेव्हा सत्तेत नसलेले व विरोधी आमदार म्हणून कार्यरत असलेल्या नारायण राणेंनी विकास केला नाही, असे नितेश राणेंना म्हणायचे आहे काय ? असा प्रतिसवाल परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला.


ते म्हणाले, राज ठाकरेंना राज्य आणि केंद्रातील अनेक नेते भेटत असतात. नितेश राणे यांनी जिल्ह्यात आलेल्या राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. तरी नितेश राणेंच्या सांगण्याने राज ठाकरे निर्णय घेत नाहीत. आमदार म्हणून समानतेने वागण्याच्या सभागृहात घेतलेल्या शपथेचा विसर नितेश राणे यांना पडला आहे. त्यामुळेच ते नांदगाव येथे केलेल्या वक्तव्याप्रमाणेच वक्तव्ये करीत आहेत. असेही परशुराम उपरकर म्हणाले.