
बाणकोट : मंडणगड तालुक्यात रविवारपासून सतत कोसळणाऱ्या धुंवाधार पावसाचा फटका तालुक्यातील बाणकोट, वेसवी, वाल्मिकीनगर गावातील घरांना बसला असून घरांचे मोठे नुकसान झाले. मातीचे एक घर पूर्णतः कोसळले तर एका घरावर संरक्षण भिंत कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाची तालुक्यात २४ तासांत तब्बल २११ मिमी नोंद झाली आहे. सोमवारीही मुसळधार पाऊस सुरूच होता. अनेक ठिकाणी नुकसानाची नोंद झाली असून त्यांच्या पंचानाम्यांचे सोपस्कार महसूल विभागाच्या वतीने सुरु आहेत. सक्रीय झालेल्या मान्सूनने सुरवातीलाच धुंवाधार बँटिंग केल्याने तालुक्यातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले आहे. बाणकोट येथील ललिता पिंपळकर याचे मातीचे पूर्णतः पावसामुळे कोसळले असून या घराचे सुमारे १ लाख ४३ हजारांचे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या घरात कोणीही सद्या राहत नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, वेसवी येथील विष्णू मोहिते यांच्या घराचा काही भाग कोसळल्यामुळे घराला तडा गेला असून त्यांचे ५७ हजारांचे नुकसान झाले आहे. सुरक्षेच्या दृष्ठीने त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. वाल्मिकीनगर येथे नासीर बेग यांच्या घरावर मोठा दगड कोसळून पडल्याने घराच्या भिंतीला तडे गेले, त्यामुळे त्यांचे ५४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. वेसवी येथील रस्त्यालगत असलेल्या धबधब्याचा प्रवाह वाढल्याने त्याचे पाणी रस्त्यावर आले होते काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. रविवारपासून सुरु असलेली मुसळधार पावसाची संततधार सोमवारी दिवसभर सुरु होती.
पावसाची जोर एव्हडा होता कि, पहिल्याच पावसात तालुक्यातील मोठी असलेल्या भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. निवळी नदीही दुथडी भरून वाहू लागली. तर तालुक्यातील धबधबेही प्रवाहित झाले आहेत. यंदा मान्सून लवकर सक्रीय झाल्याने शेतकऱ्यांसह बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांची कामे खोळंबली आहेत. रोहिणी नक्षत्राअगोदरच सुरु झालेल्या या मान्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामे खोळंबली आहेत. फोटो – पावसामुळे बाणकोट येथे घर कोसळून नुकसान झाले पावसामुळे तालुक्यातील भारजा नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली.