मान्सूनपूर्व पावसामुळे वेंगुर्लेत लाखोंचे नुकसान..!

Edited by: दिपेश परब
Published on: May 23, 2024 14:16 PM
views 193  views

वेंगुर्ला :  विजांचा गडगडाट आणि वादळीवाऱ्यांसह  बुधवारी २२ मे रोजी सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे तालुक्यात काही वीज पडून व घरांवर झाडे पडून तालुक्यात एकूण अंदाजे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वेंगुर्ला आपत्ती विभागाकडून देण्यात आला आहे.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन मान्सुनपुर्व पावसाची रिपरिप सुरूच होती. मात्र मंगळवारी २१मे रोजी रात्री ९ नंतर व बुधवारी २२ मे रोजी सायंकाळी ५ नंतर जोरदार अवकाळी पावसाने विजांच्या गडगडाटा सहित हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासहित वादळीवाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरूवात झाली. यावेळी वाऱ्याचा वेग सुद्धा वाढला होता. सायकांळी उशिरापर्यत तालुक्याच्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत होत्या. यामुळे तालुक्यातील परुळेबाजार गवाण येथील कानु लुमाजी परुळेकर यांच्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या माडाच्या झाडावर वीज पडल्याने घरातील विद्युत उपकरणे जळून सुमारे ३० हजारांचे नुकसान झाले. पेंडूर येथील कृष्णा गोविंद कळोजी यांच्या विद्युत मीटर मध्ये बिघाड होऊन विद्युत उपकरणे जळून सुमारे १ लाखांचे नुकसान झाले. तसेच शिरोडा गांधीनगर येथील भगीरथ हाडये यांच्या घरावर माडाचे झाड पडून सुमारे २० हजारांचे तर शिरोडा येथील दत्ताराम नारायण गावडे यांच्या घरावर माडाचे झाड पडून सुमारे ३० हजारांचे नुकसान होऊन तालुक्यात एकूण अंदाजे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद वेंगुर्ला तहसील आपत्ती विभागात झाली आहे. 

या पावसामुळे बुधवारी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. तर आज गुरुवारी २३ मे रोजी सकाळपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने वीज वितरणच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पहिल्याच पावसात ही परिस्थिती असेल तर पुढे संपूर्ण पावसाळ्यात वीज वितरणच्या अशा कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त करण्यात आल्या.