
मंडणगड : रायगड जिल्हयातील वराठी येथे एकाचा खून करुन, त्याचा मतदेह पोत्यात भरुन रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ मार्गाने रायगड जिल्ह्यातील पांगळोली गावाचे हद्दीत टाकणार्या तिघांना म्हसळा पोलिसांनी अवघ्या बारा तासांत गजाआड केले आहे.
म्हसळा तालुक्यातील पांगळोली बंडवाडी येथे एका पोत्यात मानवी मृतदेह असल्याची शंका व्यक्त करणारा फोन म्हसळा पोलिसांना 17 मार्च रोजी आला होता. म्हसळा पोलिसांनी घटनास्थळी जावून, त्या पोत्याची तपासणी केली असता, त्या पोत्यात 40 ते 45 वर्षे वयाच्या पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे अवघड झाले होते. मात्र, मृताच्या खिशात पोलिसांना एक डायरी आणि त्या डायरीत एक मोबाईल क्रमांक लिहिल्याचे आढळले. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, तो क्रमांक कोंढेपंचतन येथील लेबर ठेकेदार संतोष साबळे याचा असल्याचे निष्पन्न झाले. संतोष साबळे याला म्हसळा पोलीस ठाण्यात बोलावून त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी साबळे याच्या वराठी येथील साईटवर चौकशी केली असता, या साईटवरील दोन कामगारांनी हा खून केल्याचे स्पष्ट झाले. मृताचे नाव उमेश पासवान उर्फ बादशहा असे असून, तो नालासोपारा येथील रहिवासी आहे. साबळे याने त्याला लेबर म्हणून कामावर ठेवले होते. धुलीवंदनाच्या दिवशी (13 मार्च) राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असलेल्या अक्षय कन्सट्रक्शन कंपनीचे रायगड जिल्ह्यातील वराठी येथील साईटवरील कामगारांमध्ये वाद झाला होता. त्यातूनच रॉडने मारहाण करुन दोन कामगारांनी त्याला जीवे ठार मारले. या प्रकाराची माहिती साबळे याला दिल्यानंतर त्यानेच, हा मृतदेह गोणीत भरुन रायगड जिल्हा हद्दीत टाकून देण्याचा सल्ला या कामगारांना दिला. या प्रकरणी संतोष साबळे, विशाल देवरुखकर(रा. गुहागर), श्यामलाल मौर्य (रा. उत्तरप्रदेश या तिघांना म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात 17 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर, केवळ बारा तासांत खुनाचा तपास लावून आरोपी गजाआड करणार्या म्हसळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
या खुन प्रकरणाच्या तपास कामात, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाले, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवले आणि त्यांचे सहकारी संतोष चव्हाण, सागर चितारे, सदाशिव विघ्ने, हंबीर, स्वप्नील निळेकर यांनी महत्वाची भुमिका बजावली.
अक्षय कन्सट्रक्शन कंपनी संशयाच्या भोवऱ्यात- अक्षय कंन्सट्रक्शन कंपनी आंबडवे लोणंद मार्गावरील महाड ते आंबडवे या अंतरातील कामाचे ठेका मिळाली आहे या कंपनीचा वराठी येथे असलेल्या मोरीच्या कामाकरिता कामगार कामाचे ठिकाणी झोपडी बांधून रहात होते. या कंपनीच्या कार्यपध्दतीबद्दल स्थानिकांच्या अनेक तक्रारी आहेत मात्र प्रशासन व महामार्ग प्राधिकरण याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत होते. या कंपनीच्याच साईटवर काही महिन्यापुर्वी बांग्लादेशी नागरीक कामगार म्हणून काम करीत असल्याने महाड पोलीसांकडून त्यांचेवर कारवाई करण्यात आली होती यावेळी यंत्रणा व कंपनी व्यवस्थापनाने ती ठेकेदारीचा माणसे असल्याचे सांगून अंग झटकले होते. होळीच्या सणाचे कालवधीत याच कंपनीच्या कंपनीच्या कामगारांचे वादातून एकाच खून करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. मंडणगड धुत्रोली येथे कंपनीचे साईटीवर देशी मद्याची राजरोस खुली विक्री केली जात असल्याची स्थानीकांची तक्रार आहे. कायदा व बळाचा वापर करुन कंपनी व्यवस्थापन स्थानीकांच्या तक्रारी नेहमी मोडून काढत असते त्यांच्या चांगल्या सुचनांकडेही दुर्लक्ष केले जाते मात्र अशा गैरप्रकारांमुळे महाड मंडणगड तालुक्यातील सामाज जीवन धोक्यात आले आहे याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष करु नये अशी मागणी मंडणगड तालुक्यातून केली जात आहे.