
शशिकांत मोरे
रोहा : गेली तब्बल १२ वर्षे सुरू असलेल्या आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी रायगड प्रेस क्लबतर्फे पुन्हा एकदा तातडीने बांधकाम दुरुस्ती करावी, या मागणीसाठी कोलाड नाक्यावर बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह राज्यातील ज्येष्ठ पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली रायगड प्रेस क्लबच्या वतीने करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला रोह्यातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),रोहा सिटीजन फोरम, युवकांचे सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान, वसुंधरा फाऊंडेशन याबरोबरच विविध रिक्षा/मिनी डोअर चालक-मालक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग व्हावा, यासाठी कोकणातील पत्रकारांनी एकत्र येऊन हा प्रश्न हाती घेतला. अनेक आंदोलने, मोर्चे, साखळी उपोषणे करण्यात आलीत. तेव्हा चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. दरम्यान पनवेल ते इंदापूर या एका टप्प्याचे काम राष्ट्रीय महामार्गातर्फे करण्यात येत आहे. बारा वर्षांपासून रखडलेला देशातील हा एकमेव महामार्ग आहे. महामार्ग असूनही त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरावस्था निदर्शनास आणणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहे. या कामाच्या दर्जाबाबत कोर्ट कमिशनर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. २०११ साली सुरू झालेले महामार्गाचे काम २०१४ साली पूर्ण करावयाचे होते, मात्र एक तप उलटून गेले, तरीही सदर काम पूर्णत्वास आले नाही. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे मागील ९ महिन्यात सुमारे ४९ निष्पाप प्रवाशांचा बळी या महामार्गाने घेतला आहे.
सतत होणाऱ्या अपघातांमुळे अनेक जण जखमी तर कित्येक जण अपंग झालेत. मृत्यूचा सापळा बनलेल्या या महामार्गाची युद्ध पातळीवर दुरुस्ती करावी आणि प्रवाशांना, वाहनचालकांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बुधवारी जिल्ह्यातील सर्व पत्रकार मानवी साखळी आंदोलन करणार आहेत. जिल्ह्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दिलेल्या या आंदोलनात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय कोषाअध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर यांसह पदाधिकारी वर्गाने केले आहे.