राधाकृष्ण चषक सांगीतिक महोत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: May 06, 2025 14:56 PM
views 163  views

सावंतवाडी : श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग' व 'स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांव' यांच्या संयुक्त विद्यमाने "राधाकृष्ण चषक २०२५" या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन श्री देव वेतोबा मंदिर सभागृह येथे करण्यात आले होते. या अंतर्गत 'शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल) स्पर्धा' व 'सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा' घेण्यात आली.

 महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादीत ʼशास्त्रीय गायन(हिंदुस्थानी ख्याल) स्पर्धाʼ संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील आंतरराष्ट्रीय किर्तीच्या जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात शास्त्रीय गायिका विदुषी मंजिरीताई आलेगांवकर, राधाकृष्णा संगीत साधनाच्या अध्यक्षा संगीत अलंकार वीणा दळवी, वेतोबा देवस्थानचे मानकरी दादा प्रभूआजगांवकर, अण्णा झांट्ये, मालवणी कवी दादा मडकईकर, आजगांव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. भागीत आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या 'शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल)' विभागात प्रथम पारितोषिक रोख ₹ ५५०१/- व 'राधाकृष्ण चषक'ची मानकरी ठरली माणगांव ता. कुडाळची पल्लवी संजय पिळणकर. द्वितीय पारितोषिक रोख ₹ ३५०१/- व सन्मानचिन्हची विजेती ठरली कुडाळचीश्रृती शरद सावंत. तृतीय पारितोषिक रोख ₹ २५०१/- व सन्मानचिन्हचा विजेता ठरला शेर्ले सावंतवाडीचा अक्षय तुकाराम कांबळी. उत्तेजनार्थ प्रथम ₹१५०१/- वजराट ता. वेंगुर्लेची वैष्णवी महादेव चव्हाण तर उत्तेजनार्थ द्वितीय ₹११०१/-चा विजेता ठरला अणसूर, वेंगुर्लेचा हर्षल सगुण मेस्त्री. शास्त्रीय संगीतातील विख्यात गायिका विदुषी मंजिरीताई आलेगावकर यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं. यावेळी स्पर्धक व संगीत साधकांना शास्त्रीय संगीताविषयी सुंदर असं मार्गदर्शन केलं. पारितोषिक वितरण सोहळा जिल्हा बॅंक अध्यक्ष सन्माननीय मनिषजी दळवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री एकनाथ नारोजी, आणि देवस्थानचे मानकरी आणि परिक्षक महोदयांच्या हस्ते करण्यात आला.

या सांगितिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादित "सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा" छोटा गट व मोठा गट अशी दोन गटात घेण्यात आली. परिक्षक मंजिरीताई, संगीत अलंकार सौ. वीणा दळवी, भजनसम्राट बुवा भालचंद्र केळुसकर, डाॅ. चितारी आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सवेष नाट्यगीत गायन विभागात छोट्या गटातून प्रथम पारितोषिक रोख ₹ ३००१/- व 'राधाकृष्ण चषक' ची मानकरी ठरली मळगाव सावंतवाडीची मुग्धा महेश पंतवालावलकर द्वितीय पारितोषिक रोख ₹ २००१/- व सन्मानचिन्ह खारेपाटणची प्राजक्ता अभय ठाकूरदेसाई तर तृतीय पारितोषिक ₹१००१/-चा विजेता ठरला डेगवे सावंतवाडीचा सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर. उत्तेजनार्थ प्रथम ₹७०१ तुळस वेंगुर्ले येथील ज्ञानेश्वरी प्रवीण तांडेल हिने मिळवला. तर उत्तेजनार्थ द्वितीय रत्नागिरीची स्वरा मंगेश लाकडे आणि उत्तेजनार्थ तृतीय आजगावची मैत्री दयानंद मालवणकर ठरली

सवेष साभिनय नाट्यगीत' मोठ्या गटातून प्रथम पारितोषिक रोख ₹ ५००१/- व 'राधाकृष्ण चषक'चा मानकरी ठरला रत्नागिरीचा आदित्य आनंद लिमये रत्नागिरीचेच सार्थ नरेंद्र गव्हाणकर द्वितीय पारितोषिक रोख ₹ ३००१ व सन्मानचिन्ह विजेती ठरली. तर तृतीय पारितोषिक रोख ₹२००१/- व सन्मानचिन्हची विजेती ठरली सावंतवाडीची केतकी सोमा सावंत. रत्नागिरी येथून आलेली स्वरा अमित भागवत उत्तेजनार्थ प्रथम ₹१००१/ची विजेती ठरली तर तळवडे सावंतवाडीचा हेमंत हनुमंत गोडकर व तुळस वेंगुर्लेची हर्षदा बाळकृष्ण होडावडेकर उत्तेजनार्थ द्वितीय ₹५०१/- पारितोषिकाची मानकरी ठरली. या स्पर्धेचे परीक्षणही विदुषी मंजिरी आलेगावकर यांनीच केले. यावेळी त्यांनी स्पर्धकांना बहुमुल्य असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा सन्माननीय परिक्षक विदुषी मंजिरीताई आलेगावकर, भजनसम्राट भालचंद्र केळुसकर बुवा, प्रा. वैभव खानोलकर, वीणा दळवी, एकनाथ नारोजी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

स्पर्धेसाठी स्पर्धकांना संगीत साथ, हार्मोनियम साहिल घुबे, मंगेश मेस्त्री, ऑर्गन श्री भालचंद्र केळुसकर बुवा तर तबला साथ श्री प्रसाद मेस्त्री, गोवा येथील आदित्य तारी यांनी केली. दोन्ही दिवसाच्या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कात्रे यांनी केलं. अनेक संगीत साधकांनी व संगीतप्रेमी रसिकांनी यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व "राधाकृष्ण चषक २०२५" हा सांगीतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार, पारितोषिकांचे सर्व प्रायोजक, कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व सहभागी स्पर्धक, उपस्थित सर्व संगीतप्रेमी, स्पर्धेचे मान्यवर परीक्षक, श्री वेतोबा देवस्थानचे सर्व मानकरी, दोन्ही मंडळांचे सर्व सदस्य, श्री राधाकृष्ण संगीत साधनाचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक वर्ग या सर्वांचे 'श्री राधाकृष्ण संगीत साधना'चे सचिव हेमंत दळवी यांनी आभार मानले.