पुंडलिक दळवी यांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

Edited by: विनायक गावस
Published on: September 17, 2022 22:53 PM
views 229  views

सावंतवाडी : व्यापाऱ्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून व्यापार व उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना मनसेच्या काही कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना सायंकाळी राष्ट्रवादी कार्यालय येथे घडली. संशयीतांमधील एक जण व्यापारी आहे. त्यावरूनच हा प्रकार घडल्याच समोर येत आहे. दरम्यान, याबाबत तक्रार देण्यासाठी पुंडलिक दळवी यांनी पोलीस ठाणे गाठले. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. तर मारहाण करणाऱ्यांपैकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाचारण करण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.


दरम्यान, सावंतवाडी शहराचा आदर्श इतर तालुके ठेवत असतात, सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांच असं हे शहर आहे. असं असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या घरात घुसून कार्यालयात बसले असताना त्यांच्यावर हल्ला केला. यात पक्षीय कोणतेही मतभेद नसताना केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षाचा वापर करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांनी दळवी एकटे असताना जमाव करून हल्ला केला. या लोकांचा पुर्व इतिहास तपासून गुन्हे दाखल करण्यात यावे, मारहाण करताना संबंधित हे मद्याच्या नशेत होते असा आरोप राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला. सावंतवाडीची ओळख हे अंमली पदार्थांच किंवा मद्याच शहर, चोरट्या मद्याची वाहतूक अशी होत आहे ती पुसुन काढण्याची वेळ आहे. पोलिस प्रशासनाने अशा लोकांवर कारवाई करत ती पुसून टाकावी असं मत त्यांनी व्यक्त केले. आम्ही सर्वजण देखील संघर्षातून तयार झालेले आहोत. राजकीय संघर्ष आम्हाला नवीन नाही. परंतु चुकीच्या कारणासाठी समाजात स्थान असणाऱ्या एखाद्या पक्षाच्या तालुकाध्यक्षाला वैयक्तिक कारणासाठी पक्षीय ढाल करून हल्ला होण चुकीच आहे. अशा लोकांनी एकटे असताना हल्ला केला म्हणजे आपण जिंकलो अस वाटत असेल परंतु असा प्रकार करण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यास जशास तस प्रत्यूत्तर दिल जाईल अस सामंत म्हणाले.

तर माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, अँड. अनिल निरवडेकर, हेमंत बांदेकर आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात पुंडलिक दळवी यांची भेट घेत घटनेची चौकशी केली. यावेळी संजू परब म्हणाले, या घटनेचा मी निषेध करतो. हे सावंतवाडीच्या संस्कृतीला धरून नाही आहे. ही संस्कृती लगेच चिरडली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची भूमिका पोलिसांची राहिलं. एखाद्याच्या घरात घुसून असे प्रकार होत असतील तर भितीच वातावरण निर्माण होईल. अशा लोकांना अटक करून कारवाईची मागणी पोलिसांना केल्याची परब यांनी म्हटल.

दरम्यान, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तर कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी या घटनेची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर बॉडी बिल्डर असोसिएशन जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डींग असो. नं निषेध नोंदवला आहे.