
सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्यावतीने जिल्हास्तरीय पंच शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या चेअरमन शुभदादेवी भोंसले उपस्थित होत्या.
यावेळी संस्थेचे संचालक तथा ज्येष्ठ मार्गदर्शक जयप्रकाश सावंत, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध मालवणी कवी रुजारीओ पिंटो, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दिनेश चव्हाण , प्राध्यापक संदीप पाटील, प्राध्यापक योगेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात जवळपास ५० जिल्हा व राज्य पंच सहभागी झाले होते. विशेष म्हणजे नुकतेच जिल्हा पंच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचांची उपस्थिती लक्षणीय होती . याप्रसंगी जिल्हा पंच परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम आलेले श्री पराग वालावलकर, द्वितीय श्री आनंदा बामणीकर व तृतीय श्री संदीप शेळके व श्री मिलिंद निकम यांना राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच उत्तीर्ण झालेल्या सर्व पंचांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, कबड्डी हा देशी खेळ आहे. महाभारतात या खेळाचा प्रामुख्याने उल्लेख आहे. पूर्वी मैदानी खेळांना व परंपरांना प्रामुख्याने राजाश्रय दिला जात असे सावंतवाडीच्या राजघराण्याने कोकणातील लोकसंस्कृती, परंपरा आणि क्रीडा यांचे जतन व संवर्धन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सावंतवाडी संस्थानाच्या आश्रयामुळे दशावतार ही कोकणातील पारंपरिक लोकनाट्यकला टिकून राहिली व विकसित झाली. कलाकारांना राजाश्रय, मानधन व सन्मान मिळाला.भजन, कीर्तन, भारूड, फुगडी, जाखडी नृत्य अशा कलांना प्रोत्साहन देण्यात आले.दसरा, शिमगा (होळी), गणेशोत्सव यांसारख्या सणांचे सार्वजनिक स्वरूपात आयोजन करून लोकसहभाग वाढवला. सावंतवाडी लॅकरवेअर (लाकडी खेळणी व सजावटी वस्तू) या परंपरागत कलेला राजाश्रय देऊन ती जगप्रसिद्ध केली. कुस्ती, मल्लखांब, तलवारबाजी, भालाफेक, घोडेस्वारी यांना उत्तेजन देण्यात आले.युवकांच्या शारीरिक व नैतिक विकासासाठी आखाडे उभारण्यात आले. सण-उत्सवांच्या निमित्ताने क्रीडा स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना पारितोषिके दिली जात. क्रीडेमधून शिस्त, धैर्य व नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर होता. लोककला व क्रीडांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय भावना आणि संस्कृतीचा अभिमान वाढवला आहे.
सावंतवाडी राजघराण्याने लोककला, परंपरा आणि क्रीडा यांना दिलेला राजाश्रय हा केवळ मनोरंजनापुरता न राहता सांस्कृतिक वारसा जपणारा आणि समाजघटकांना एकत्र आणणारा होता . आजही कोकणाची सांस्कृतिक ओळख या योगदानामुळे जिवंत आहे. सावंतवाडी संस्थानाचे लोक कल्याणकारी राजे म्हणून पहिले खेम सावंत भोंसले ते चौथे खेम सावंत भोंसले यांनी या संस्थानाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे . भारताच्या नकाशात एक सावंतवाडी (सुंदरवाडी ) म्हणून शहर वसवून राजघराण्याने दिलेला ऐतिहासिक वारसा येथील नागरिकांना अभिमानास्पद वाटत आहे हे पाहून आम्हाला आनंद होतो .माझे सासरे शिवराम राजे भोंसले व या सत्वशीला देवी भोंसले व आम्हीही सर्वजण या लोककल्याणकारी मूल्यांचा वारसा जोपासत आलेलो आहोत. आज या कबड्डी पंच शिबिरात जिल्ह्याभरातून आलेल्या आपल्या सर्वांना भेटून मला खूप आनंद झाला. आमच्या संस्थेच्या वतीने प्रायमरी स्कूल पासून पीएचडी पर्यंत सुरू असलेल्या या कॉलेजमध्ये शिक्षणाबरोबर कला व क्रीडा गुणांना प्रामुख्याने वाव दिला जात आहे .अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या महाविद्यालयाने दिलेले आहे .कबड्डी पंच हा सामन्यावर तासन तास उभा राहून अचूक व निपक्षपाती निर्णय देण्याचे काम करतो. हे काम खूप कठीण आहे एखाद्या न्यायाधीशाला निर्णय देण्यासाठी खूप अवधी मिळू शकतो. परंतु पंचाला मात्र त्या क्षणी तात्काळ, अचूक निर्णय द्यावा लागत असतो .त्यामुळे कबड्डी पंच हा त्या सामन्याकरिता न्यायाधीशच असतो आणि त्यामुळे त्यांना कबड्डी खेळाच्या नियमावलीचे सखोल ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे .अशा पंच शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यात सक्षम असे कबड्डी पंच तयार होतील ,कबड्डी खेळाला पुढे नेतील असा माझा विश्वास आहे . कबड्डीचे कार्य असेच जोमात सुरू ठेवा राजघराण्याकडून आपल्याला जे सहकार्य करता येईल ते निश्चितच केले जाईल असे आश्वासन दिले. आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रायमरी स्कूल पासून महाविद्यालयीन युवकांपर्यंत कबड्डी खेळाचे प्रशिक्षण व कबड्डी संघ तयार करण्यासाठी आमची संस्था प्रयत्नशील राहील असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले.
संघटनेचे अध्यक्ष रुजारीओ पिंटो यांनी पंचांना शिबिरासाठी शुभेच्छा देताना दुपारच्या भोजनाचा आस्वाद आपल्यावतीने जाहीर केला . त्यांनी याप्रसंगी 'माय''ही त्यांची प्रसिद्ध कविता प्रस्तुत करून उपस्थितांची वाहवा मिळवली .सिंधुदुर्ग जिल्ह्याला सक्षम आणि उत्कृष्ट कबड्डी पंच मिळावेत,व त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव आपल्या कामगिरीने उंचवावे,प्रो कबड्डी सारख्या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील पंच कामगिरी करताना सर्वाना दिसावेत याकरिता सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन सदैव आपल्या पाठीशी राहील त्यासाठी आवश्यक असणारी प्रशिक्षणे, शिबिरे, विविध स्पर्धांवरील नियुक्त्या,सातत्य अशा बाबींची पूर्तता संघटना करीत राहील असा विश्वास आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी व्यक्त केला. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र हे जितके महत्त्वाचे आहे त्याहीपेक्षा उत्कृष्ट पंच म्हणून आपली मैदानावरील कामगिरी मौल्यवान आहे. आपल्या अचूक निर्णय क्षमतेमुळे एक उत्कृष्ट पंच म्हणून नावलौकिक मिळविणे ही बाब पंचांसाठी प्रेरणादायी ठरत असते असे मत दिनेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
एकदिवशीय या शिबिरामध्ये राष्ट्रीय पंच प्रशांत वारीक, प्रीतम वालावलकर,राज्य पंच किशोर पाताडे यांनी नियमांची उजळणी, व्हिसलिंग, सिग्नलिंग, सामनाधिकारी कार्य, कर्तव्य, निर्णय समय सूचकता, गुणलेखन, सहाय्यक गुणलेखन, तिसरी चढाई, लेखी स्मरण परीक्षा, शंका निरसन व चर्चा अशा विषयांवर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. पंच शिबिराचे उत्कृष्ट आयोजन होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . डि एल भारमल, सी. ए. नाईक, राष्ट्रीय पंच प्रीतम वालावलकर, राष्ट्रीय पंच मधुकर पाटील, जिल्हा पंच श्री मिलिंद निकम यांचे विशेष सहकार्य लाभले.










