नव्याकोऱ्या रस्त्यावर पाण्याची डबकी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 25, 2024 12:59 PM
views 317  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेने शहरातील बऱ्याचशा रस्त्यांचे डांबरीकरण काम हाती घेत पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त केले होते‌. याचवेळी गेल्या दहा वर्षांपूर्वी डांबरीकरण झालेला व अनेक वर्षे खड्डेमय असलेला जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानच्या शेजारील रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु या रस्त्याचे काम करताना जुन्या रस्त्यावर असलेले खड्डे आणि जिथे पाणी साचायचे अशा सखल भागाकडे ठेकेदार आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नव्याने केलेल्या रस्त्यावर जागोजागी मान्सून पूर्व पावसातच डबकी साचली. यामुळे जनतेचा पैसा पाण्यात गेला असल्याचे दिसत आहे.

हे डांबरीकरण कोलगाव येथील ठेकेदाराने केले असून काम सुरू केले त्यावेळीच परिसरातील नागरिकांनी पाणी साचत असलेल्या भागांची माहिती देत खड्ड्यांमध्ये जास्त खडी घालून रस्त्याची उंची वाढविण्याबाबत ठेकेदाराला सूचना केली होती. परंतु काम सुरू करताना आलेला ठेकेदार काम पूर्ण झाले तरी फिरकलेला दिसला नाही. नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने देखील अनेक वर्षे रखडलेला, उपोषणे, आंदोलने झालेला रस्ता असताना देखील दुर्लक्ष केल्याने रस्त्याचे काम सुमार दर्जाचे होऊन रस्त्यावर जागोजागी डबकी पडून पाणी साचत आहे. या रस्त्यावरून केवळ सालईवाडा परिसरातील नागरिक जात नसून मिलाग्रिस शाळेच्या कितीतरी मुलांची वर्दळ असते. पावसाळ्यात रस्त्यावर असलेल्या डबक्यात पाणी साचल्याने मुलांना पाण्यातून मार्ग काढत जाण्याची पाळी येणार असून रस्त्याने जाणाऱ्या वाहनांमुळे घाणीचे पाणी अंगावर उडण्याची शक्यता आहे. मान्सून पूर्व पावसातच डबकी पडल्याने येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा रस्ता उखडून खड्डेमय होण्याची शक्यता आहे. नगरपालिका प्रशासनाने या कामाची दखल घ्यावी अशी मागणी सालईवाडा प्रभागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.