
सावंतवाडी: मुख्य प्रवाहात असणाऱ्या कवितांचे कवी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. इथे होणाऱ्या सोहळ्यात मिसळावसं वाटत. कारण, ते कायम स्मरणात राहतात. विकासाची परिभाषा सांगणार काव्य जे मराठीतही नाही ते 'जपलाला कनवटीचा' या काव्यसंग्रहात आहे. कवयित्रीचा अंतस्वर व्यापक अर्थ सांगणारा, आत्मस्वर प्रामाणिक आहे. बोलीतील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेत ती जपण्याचं काम कवयित्रीनं केलय असे प्रतिपादन बोली भाषा अभ्यासक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केलं. कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या ''जपलला कनवटीचा'' या काव्यसंग्रहाच प्रकाशन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे कल्पना बांदेकर लिखित, प्रभा प्रकाशन प्रकाशित ''जपलाला कनवटीचा'' या काव्यसंग्रहाच प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख तथा बोली भाषा अभ्यासक डॉ. नंदकुमार मोरे, प्रा. प्रवीण बांदेकर, अजय कांडर, प्रा.डॉ. शरयू आसोलकर, मधुकर मातोंडकर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कवयित्री कल्पना बांदेकर म्हणाल्या, बरीच वर्षे कविता लिहून झाली. आज प्रकाशनाचा योग जुळून आला. मालवणी बोलायला सोपी असली तरी लिहायला कठीण आहे. आज मालवणीला चांगले दिवस आलेत. माझी नाळ मालवणीशी जोडली गेली आहे. आजकाल चित्रपट, सिनेमातली मालवणी ऐकून कानफटात बसल्यागत वाटतं. तो मालवणी ठसका जपला गेला जात नाही. यातूनच ७५०० मालवणी शब्दांचा संग्रह मी केला आहे. १० हजार शब्द संग्रह करण्याचा माझा मानस आहे. लवकरच त्याचेही प्रकाशन होईल. 'आजयेच्यो काडयो' हा देखील कथा संग्रह प्रकाशित करण्याचा मानस आहे.
मालवणी साहित्यात कल्पना बांदेकर हे नाव जोडलं गेलं आहे. त्यांच्या कवितांत लोकगीतातील एक आशय आहे. वेगवेगळी व्यक्तीचित्र यात आहेत. प्रत्येक कवितेतून एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे. हे पूर्वीच्या कोणत्याही मालवणी कवितेत दिसणार नाही. ते वेगळेपण कल्पना बांदेकर यांच्या कवितेत दिसतं असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी काढले. तसेच मधुकर मातोंडकर, डॉ. शरयू आसोलकर, मृणालिनी कशाळीकर, सरिता पवार, रमेश बोंद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश बोंद्रे, अँड. पुप्षलता कोरगावकर, दादा मडकईकर, संध्या तांबे, विठ्ठल कदम, अनिल जाधव, कुमार कांबळे, मनोहर परब, दीपक पटेकर, रामदास पारकर, बंड्या धारगळकर, प्रकाश तेंडोलकर, रवी जाधव, ओंकार तुळसुलकर, सरिता पवार, मृणालीनी कशाळीकर, ज्योती तोरसकर, प्रज्ञा मातोंडकर, प्रतिभा चव्हाण, मेघना राऊळ, स्नेहा कदम, रामा वाडकर, संपद देसाई, दिनानाथ बांदेकर, वृषाली सामंत, मित भोगवीर आदींसह बांदेकर कुटुंबिय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर, प्रास्ताविक अजय कांडर यांनी केले.