संतोष वायंगणकर लिखित 'सेलिब्रिटींचा कोरोना काळ'चं प्रकाशन

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 09, 2023 20:10 PM
views 100  views

कणकवली : सेलिब्रिटी कुटुंबात आणि समाजात कशाप्रकारे वागतात, याबाबत सर्वसामान्य नागरिकांना कुतूहल असते. पत्रकार संतोष वायंगणकर यांनी सेलिब्रिटींचा कोरोना काळ हे पुस्तक लिहून जगातील कोणत्याही समूह दुःखात सेलिब्रिटी किंवा सामान्य माणूस या दोघांची वेदनेची नस सारखीच असते. महामारीच्या काळात सेलिब्रिटीही अधिक समान्य स्तरावर जगत असतात हे सेलिब्रिटींचा कोरोना काळ या पुस्तकातून अधोरेखीत झाले आहे. मातीशी नाळ जोडलेल्या माणसांचा समाजातील वेदना व दु:ख कळत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि समीक्षक,लेखक प्रा. जी. ए. सावंत यांनी केले. सेलिब्रिटींचा कोरोना काळ या पत्रकार संतोष वायंगणकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन प्रा. जी ए.सावंत यांच्या हस्ते कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात विशेष कार्यक्रमात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन कणकवली तालुका पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी प्रांत अधिकारी जगदीश कातकर डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरोसकर, पुस्तकाचे प्रकाशक अजय कांडर,अभिनेते अभय खडपकर, सहाय्यक गटविकास अधिकारी सूर्यकांत वारंग, पत्रकार समिती कणकवली चे अध्यक्ष अजित सावंत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी कणकवली प्रांताधिकारी जगदिश कातकर म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत आपण नागपूर येथे कार्यरत होतो. नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होता. हा संकट काळ कसा होता, याचा अनुभव आपण घेतला. कोरोना काळाने जगाला माणूसकी दाखवून दिली. याकाळात मला सकारात्मक व नकारात्मक अनुभव आला. विश्वव्यापी संकट काळात सेलिब्रिटींचा कोरोना काळ हे पुस्तक सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. संतोष वायंगणकर हे भीती न वाटणारे पत्रकार आहे.त्यांची भीती वाटत नाही.वायंगणकर यांनी यापुढील काळात अजूनही चांगल्याप्रकारे लिखाण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले, वृत्तपत्र हा समाजाचा आरसा असला पाहिजे. या दृष्टीकोनातून सेलिब्रिटींचा कोरोना काळ हे संतोष वायंगणकर यांनी पुस्तक समाजापुढे आणले. या पुस्तकांतील सेलिब्रिटींपैकी ८० टक्के सेलिब्रिटी कोकणातील आहेत. संतोष वायंगणकर हे अवितरपणे विविध विषयांवर लिखाण करीत आहेत. खाकी वर्दीच्या सदरामधून समाजाचा विवेक जागृत करण्याचे काम ते करीत आहेत. वायंगणकर हे विविध भाषांचा व्यासंग असलेले व्यक्तिमत्व आहे. पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठांचा आदर्श घेऊन संतोष वायंगणकर हे काम करीत आहेत. कोरोनाच्या काळात असह्य करणाऱ्या गोष्टी आपण अनुभवल्याचे सांगून त्यांनी वायंगणकर यांनी स्वत:वर कोणतेही वाईट सावली पडू न देता पत्रकार क्षेत्रात स्वतःची इमेज राखली आहे.

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोसरकर म्हणाले, संतोष वायंगणकर व मी एकावेळी पत्रकार क्षेत्रात आलो.पत्रकार क्षेत्रातील विविध घडामोडीचे आम्ही दोघेही साक्षीदार आहोत. पत्रकार माधव कदम यांच्या नंतर संतोष वायंगणकर यांनी सेलिब्रिटींचा कोरोना काळ हे पुस्तक लिहून समाजासमोर आणले आहे. याचा आदर्श इतरांनी घेऊन विविध विषयावर पुस्तके लिहावीत, असे आवाहन त्यांनी केले..

अभिनेते अभय खडपकर म्हणाले, सेलिब्रिटींचा कोरोना काळ या पुस्तकात असलेली व्यक्तिमत्वे ही कलाक्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका बजावणारी आहेत. कोरोनाच्या काळात छोट्या कलाकाराचे काय दु:ख होते, ते मी अनुभवले आहे., ज्या माणसाची वेदनेशी नाळ जुळते, तेव्हा त्याला दु:ख कळते. कलाकारांच्या अनुभवाचा ठाव घेतानाच हे पुस्तक निर्माण झाले आहे. अशा व्यक्तींचा आदर्श समोर ठेवताना ती व्यक्ती किती महत्वाची आहे हे ही कळते. नैराश्याच्या काळात प्रत्येकाने सृजनशीलता जागृती ठेवली पाहिजे, हे खूप महत्वाचे आहे. सेलिब्रिटींचा कोरोना काळ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आवाहन त्यांनी केले. उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष अजित सावंत उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, अनिकेत उचले सचिव माणिक सावंत, माजी अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, लक्ष्मीकांत भावे ,संतोष राऊळ, भगवान लोके, उमेश बुचडे, उत्तम सावंत यांनी केले. तर सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले आभार माजी अध्यक्ष संतोष राऊळ यांनी मानले.

यावेळी सभागृहात जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे,बाळ खडपकर, माजी सभापती नागेशशेठ मोरये,अशोक करंबेळकर, आनंद वैद्य ,सीमा नानिवडेकर अभिनेत्री वर्षा वैद्य, चित्रकार नामानंद मोडक, ठाकूर गुरुजी, बाळ महाजन,सौ. साळकर, श्रीमती राणे, भाई चव्हाण,दिलीप हिंदलेकर,राजू कदम, सरपंच हेमंत परुळेकर,दिलीप हिंदळेकर ,नांदगाव सरपंच भाई मोरोजकर, पंढरी वायकर, श्री पाटील, रत्नागिरी प्रहार चे प्रमुख नरेंद्र मोहिते, प्रहार डिजिटल प्रमुख हेमंत कुलकर्णी, सरपंच नरेंद्र कोलते, शिक्षक किशोर कदम,वंदना राणे,वकील नानू देसाई, नंदू उबाळे,आदींसह असंख्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोरोना काळात मनाला उभारी देण्याच्या प्रयत्नातून सेलिब्रिटींचा कोरोना काळाचे लेखन-संतोष वायंगणकर कोरोना काळात सर्वात महत्वाचा होते तो मनाला उभारी देण्याचा प्रयत्न. हाच प्रयत्न डोळ्यासमोर ठेऊन कलावंताची कोरानातील स्थिती ऊलगडण्याचा प्रयत्न झाला. एक एक कलावंत मिळत गेला.प्रत्येकाचे अनुभव विलक्षण होते.यातून लेखन घडत गेले. कोरोनाचा काळ संपला.आणि मग या लेखमालेचे पुस्तक व्हावे अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. प्रभा प्रकाशनचे निर्माते कवी अजय कांडर यांनी पुढाकार घेतला अन हे पुस्तक आकाराला आले . याबाबत सांगतानाच संतोष वायंगणकर यांनी आपल्या पत्रकारीतेच्या कारकीर्दीची वाटचाल , त्या दरम्यान आलेले अनुभव खुमासदार शैलीत सांगीतले.

आपण जे लिहीतो ते जबाबदारीचे असावे, आपल्या ऑन्थेटीक लेखनालाच साामजिकतेचे,मानवतेचे भान असायलाच हवे. याकडे लक्ष वेधतानाच त्यांनी प्रहारमध्ये संपादकीय सल्लागार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे असलेले मार्गदर्शन, राणे प्रकाशनचे संचालक माजी खा.निलेश राणे,आ. नितेश राणे, सौ.निलमताई राणे यांचे मिळणारे प्रोत्साहन याबाबत आर्वजून सांगितले.