सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 10, 2025 20:12 PM
views 25  views

सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे करून घेतली जावीत. मान्सूनपूर्व उपाय योजनांवर अधिक भर देत दुरूस्तीची कामे लवकरात लवकर संपवावी. पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, प्रभाकर सावंत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येत असलेल्या सर्व कामांमध्ये दर्जा राखण्यावर संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष द्यावे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. मंत्री भोसले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांचा सात कलमी कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रभावीपणे काम करुन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता 150 दिवसांच्या कालावधीत गुणवत्तापूर्ण कामे करुन प्रथम क्रमांक पटकावयाचा असल्याने सर्वांनी त्यादिशेने काम करावे. कामांच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड होऊ नये याची दक्षता घ्यावी. कामांच्या ठिकाणी झाडे लावण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची आणि पुलांची दुरूस्ती करण्याची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ती मागणी मान्य करुन तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विविध कामांचा, प्रगतीपथावर असलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.