देवगडात नेव्हल NCC युनिट रत्नागिरीच्यावतीने स्वच्छतेबाबत जनजागृती

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 21, 2023 18:31 PM
views 60  views

देवगड :  नेव्हल एनसीसी युनिट रत्नागिरी यांच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, यासाठी त्यांचे प्रबोधन व्हावे याकरिता एनसीसी विद्याथ्यांच्या माध्यमातून देवगड परिसरामध्ये पथनाट्य सादर करून पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यात आली, स्वच्छ कोकण, सुरक्षित कोकण ही थीम घेऊन ही मोहीम आखण्यात आली आहे.

   नेव्हल एनसीसी युनिट यांचे देवगड कस्टम ऑफिस येथे समुद्रमार्गे आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या स्वागत समारंभ मोठ्या थाटात देवगड पवनचक्की येथे करण्यात आला होता या कार्यक्रमाला 58 महाराष्ट्र बदलियन एनसीसी सिंधुदुर्ग, पत्रकार, देवगड नगरपंचायत, देवगड पंचायत समिती, देवगड पोलीस ठाणे, देवगड कस्टम, श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगड यांचे प्राचार्य व पदाधिकारी आणि पर्यटक आवर्जून उपस्थित होते.

    पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या मुलींनी नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कमांडर ऑफिसर के. राजेश कुमार यांनी देवगड वासियांनी केलेल्या स्वागताचे विशेष कौतुक केले. त्यांनी असे सांगितले की "देवगड हे पर्यटनदृष्ट्या एक सुंदर स्थळ आहे. हे सुदंर ठिकाण जेवढं सुंदर आहे तेवढंच ते स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली सर्वांची जबाबारी आहे. दिवसेंदिवस कोकणातील किनारपट्टीवरील भागामध्ये पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे किनारपट्टया व धार्मिक क्षेत्र यांचे कचऱ्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित कोकण राहण्यासाठी कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर वावरताना पर्यटनक्षेत्री फिरताना प्रत्येकाला स्वच्छतेची गोडी लागावी आणि त्या भागातील सुंदर वातावरणाचा आनंद लुटता यावा, यासाठी प्रत्येकाचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी नेव्हल युनिट रत्नागिरी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ६० विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये भाग घेतला आहे.”

    या शिबिराची सुरुवात रत्नागिरीमध्ये झाली. रत्नागिरी ते देवगड या मार्गावरील समुद्रकिनारे व पर्यटन क्षेत्र परिसरामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छ कोकण सुरक्षित कोकण ही थीम घेऊन जनजागृती केली जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये रत्नागिरी ते रनपार, दुसऱ्या टप्प्यामध्ये रनपार ते पूर्णगड आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये पूर्णगड ते आंबोळगड, चौथ्या टप्प्यांमध्ये आंबोळगड ते विजयदुर्ग, पाचव्या टप्प्यांमध्ये विजयदुर्ग ते देवगड मध्ये सर्व विद्यार्थ्यांची निवासाची सोय श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्यात आली आहे. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या ६० विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या माध्यमातून पथनाट्यातून स्वच्छतेचा नारा देऊन पर्यटकांचे प्रबोधन केले जात आहे. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज दोन ते तीन कार्यक्रम प्रत्येक टप्प्यामध्ये घेतले जात आहेत. आता या पाचव्या टप्याच्या कार्यक्रमांमध्ये देवगड पवनचक्की पथनाट्य सादर करण्यात आले आणि समुद्रकिनाऱ्यावर वावरताना कशाप्रकारे नियमांचे पालन करावे यासाठी रॅली काढण्यात आली.