
मालवण : कोकण किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसाय पुर्ण ठप्प झाला असून मत्स्य दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमार मोठया संकटात सापडला आहे. संकटग्रस्त मच्छिमारांना मत्स्यदुष्काळी नैसर्गिक आपत्ती (चक्रीवादळ) आर्थिक सहाय्य मिळावे. या मागणीचे निवेदन दांडी येथील रश्मी रोगे यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग कार्यालयास देण्यात आले आहे.
यावेळी अन्वेशा अजित आचरेकर, भाई जाधव, वसंत गांवकर, विकी रोगे, सागर जाधव, बाळा मिठकर यांसह अन्य उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेले १० दिवस आपल्या कोकण किनारपट्टीवर जे चक्रीवादळ घोंगावत आहे यामुळे पूर्णतः मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. जिल्हातील पारंपारिक मच्छिमारांवर मत्स्यदुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार मच्छिमारांना कृषी दर्जा प्राप्त झाला आहे. तरी ज्याप्रमाणे आमच्या शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्ती मुळे ओढवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीत जसे अर्थसाहाय्य मिळते त्याच धर्तीवर पारंपारिक मच्छिमारांना सुद्धा आर्थिक सहाय्य मिळावे. अशी मागणी पारंपारिक मच्छिमारांच्या वतीने आम्ही करीत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.










