
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील समस्त शेतकऱ्यांबद्दल असंसदीय भाषेचा वापर करून राज्याची बदनामी करणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष )च्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले .
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्री पदाचा राजीनाम्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उत्तम सराफदार, साबा पाटकर, सचिन पाटकर, दीपिका राणे, चंद्रकांत नाईक, रूपेश जाधव, योगेश कुबल, सावली पाटकर, ममता नाईक, रविकांत गवस, पुंडलिक दळवी आदिसह मोठ्या संखेने पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील समस्त शेतकऱ्यांबद्दल असंसदीय भाषेचा वापर केला आहे. अधिवेशन सुरु असताना चक्क सभागृहात मोबाईलवर रमी खेळणे, तसेच विविध बेजबाबदार वक्तव्य करून समस्त शेतकरी आणि महाराट्र राज्याची बदनामी केली आहे. यामुळे राज्यातील जनतेतून रोष व्यक्त होत आहे. अशा बेजबाबदार व्यक्तीला मंत्रीपदांवर राहण्याचा अधिकार नाही तरी मुख्यमंत्री यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंत्री पदाचा तात्काळ राजीनामा घ्यावा. अशी मागणी करणारे निवेदन सादर केले आहे .