शून्य शिक्षक शाळांच्या संदर्भात वेंगुर्ल्यात उद्या धरणे आंदोलन | उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक

Edited by:
Published on: June 14, 2023 18:55 PM
views 140  views

वेंगुर्ला :  तालुक्यातील एकूण जिल्हा परिषद मालकीच्या १३३ शाळा आहेत. त्यापैकी १५ शाळामध्ये सध्या एकही कायमस्वरूपी शिक्षक नाही. यामुळे मुलांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याबाबत शासनाला जाग येण्यासाठी वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयासमोर उद्या १५ जुन २०२३ रोजी सकाळी १० वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमार्फत धरणे आंदोलन करण्यात येणार असून तालुक्यातील ज्या शाळेत शून्य शिक्षक आहेत त्या भागातील पालकांनी व ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे. 

याबाबत वेंगुर्ला गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाला किंवा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना कायमस्वरूपी शिक्षण देण्यास शक्य नसल्यास सिंधुदुर्ग जिल्हयातील डीएड धारकांना शिक्षण सेवक म्हणून नेमणूक करण्यात यावी व त्यांना जिल्हा परिषद स्व. निधीतून मानधन देण्याची व्यवस्था करावी व जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना न्याय दयावा व मुलांचे नुकसान थांबवावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. तालुक्यातील कोचरा हुंबराचे पाणी, परुळे शाळा नं. १, भोगवे दुतोंड, रेडी गावतळे, रेडी कनयाळ, उभादांडा आडारी, वायंगणी नं १, केळुस मोबार, परुळे आंबेगाळी, पाल कडमवादी, आसोली सक्राळ, सरस्वती विद्यालय तुळस, वेताळमंदिर तुळस, दत्त विद्यामंदिर रेवटी तुळस आदी शाळेत शून्य शिक्षक असून या भागातील सर्व पालक व ग्रामस्थांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे.