
वैभववाडी : पिण्याच्या पाण्यासह इतर मागण्यांसाठी गेले बारा दिवस सुरू असलेले अरूणा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन स्थगित केले. विहीरीच्या कामाला सुरूवात केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी हा निर्णय घेतला.
हेत किंजळीचा माळ येथील गावठणात पिण्याच्या पाण्यासह विविध समस्या मार्गी लावाव्यात यासाठी प्रकल्पग्रस्तांनी अरुणा धरणाच्या कालव्याचे काम ५ फेब्रुवारीला बंद पाडले. त्यानंतर जोपर्यत गावठणातील विहीरीचे काम प्राधान्याने सुरू केले जात नाही तोपर्यत कालव्याचे काम सुरू होऊ देणार नाही असा निर्धार करीत धरणे आंदोलन सुरू केले. गेले बारा दिवस हे धरणे आंदोलन सुरू होते.मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. अनेकदा अधिकाऱ्यांनी चर्चा केली परंतु त्या निष्फळ ठरल्या. अखेर आज प्रकल्पग्रस्तांची मागणी मान्य करीत पुनर्वसन गावठणात खुली विहीर खोदाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले धरणे आंदोलन स्थगित केले.
या आंदोलनात माजी सरपंच सुरेश नागप, शिवाजी पडीलकर, सुनिल नागप, विजय नागप, महादेव नागप, मानाजी घाग, धोंडू नागप, विनोद नागप, परशुराम पडीलकर यांच्यासह हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्तांनी सहभाग घेतला होता.