महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात 'प्रकल्प २०२५' प्रोजेक्ट स्पर्धा

Edited by: मनोज पवार
Published on: March 26, 2025 16:40 PM
views 295  views

वेळणेश्वर : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवार दिनांक २५ मार्च रोजी 'प्रकल्प २०२५'  ही प्रोजेक्ट स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा खासकरून डिप्लोमा (अभियांत्रिकी पदवीका) विद्यार्थ्यांसाठी होती. तृतीय वर्ष डिप्लोमाचे विद्यार्थी जे तांत्रिक प्रोजेक्ट्स बनवतात त्या प्रोजेक्ट्स चे एक प्रदर्शन भरवून त्यांना योग्य पद्धतीने गुणांकन करून विजेत्यांना रोख रक्कम बक्षीस आणि सर्वांनाच प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेसाठी डॉ. आर.डी. कुलकर्णी आणि श्री. अशोककुमार यादव हे दोन सिनियर सायंटिस्ट परीक्षक म्हणून लाभले होते. 'भाभा परमाणू संशोधन केंद्र' (BARC) आणि न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन इंडिया लिमिटेड (NPCIL) मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञांची एक तुकडी महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला वर्षातून दोनदा भेट देते आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. याच शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा आजूबाजूच्या अनेक शाळा महाविद्यालयांना आणि तिथल्या विद्यार्थ्यांनाही फायदा व्हावा यासाठी महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय कायमच प्रयत्नशील राहिलेलं आहे. 

या स्पर्धेसाठी चिपळूण ते अगदी तळकोकण सावंतवाडी पर्यंतच्या अनेक डिप्लोमा महाविद्यालयांमधून जवळपास १५ प्रोजेक्ट समूह आपापले प्रोजेक्ट्स घेऊन उत्साहाने सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता स्पर्धेची सुरुवात झाली. प्रत्येक ग्रुपसमोर परीक्षक असलेले दोन शास्त्रज्ञ जवळपास १० ते १५ मिनिटे थांबून त्या प्रोजेक्ट ची माहिती घेत होते, काही प्रश्नोत्तरे होत होती आणि त्यानुसार गुणांकन केले जात होते. दुपारी दीड वाजता स्पर्धेचा समारोप झाला आणि त्यानंतर एक शानदार बक्षीस वितरण समारंभ आयोजित करून त्यात विजेते जाहीर करण्यात आले. 

प्रथम क्रमांक पटकावला शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी मधल्या संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी. या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'Jarvis AI assistant' या प्रोजेक्टला प्रथम पारितोषिक म्हणून १० हजार रुपयांची रोख रक्कम भेट म्हणून देण्यात आली. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सुद्धा शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी इथल्याच संगणक अभियांत्रिकीच्या 'Relocate io' नामक प्रोजेक्ट बनवलेल्या विद्यार्थ्यांना मिळाले. ७ हजार रुपये बक्षिसाची रक्कम त्यांना देण्यात आली. तृतीय क्रमांकामध्ये बरोबरी झाली आणि ते पारितोषिक 'सह्याद्री पॉलीटेक्नीक सावर्डे' मधील 'SPS Hub' आणि 'CNC Pen Plotter' अशा दोन ग्रुप्स मध्ये विभागून देण्यात आले. ५ हजार रुपयांचे त्यांना पारितोषिक मिळाले. 

या बक्षीस वितरण समारंभामध्ये उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. प्रस्तुत उपक्रमाच्या यशस्वीततेकरिता विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.