जिल्ह्यात ७ एप्रिलपर्यंत मनाई आदेश

Edited by:
Published on: March 21, 2025 19:15 PM
views 35  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था  अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)  व 37 (3) नुसार दिनांक 24 मार्च 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 7 एप्रिल  2025 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

जिल्ह्यात ३० ते ३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईद असे सण उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यापुर्वी राज्यात उत्सवाचे कालावधीत अनुचित घटना घडलेल्या असून त्याचं पडसाद राज्यात उमटून विविध राजकिय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्यांचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात विविध संघटनेकडुन निवेदन, निषेध आंदोलन करण्यात येत आहेत.  आरक्षणाच्या मुद्यावरुन उपोषण, आंदोलन होत आहेत तसेच सोशल मिडियावर समाजकंटकांडून धार्मिक भावना दुखवणारे आक्षेपार्ह पोस्ट व व्हिडीओ प्रस्तारीत करुन विविध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. 

वैयक्तिक्त व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा,संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील विविध समाजाचा आरक्षण मुद्दा, आगामी साजरे होणारे सण, उत्सव त्याअुषंगाने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम, सोशल मिडीयावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह पोस्ट, तसेच जिल्ह्यात होणारे उपोषणे, मोर्चा, निदर्शने,रस्ता रोको यासारख्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये व जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी यासाठी जिल्ह्याच्या  संपुर्ण  भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत आहे. वरील कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे. 

कलम ३७ (१) नुसार 

१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा  करण्यासाठी  वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.

२) अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.

३) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.

४)  व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,  (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)

५)  सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.

६)  सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम ३७(३) नुसार

१)     सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे  व  सभा घेणे.

२)  हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही . 

वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.