कुडाळ MIDC बाबत समस्यांचा होणार तातडीने निपटारा

Edited by:
Published on: December 15, 2023 15:25 PM
views 194  views

सिंधुदुर्ग : कुडाळ एम.आय.डी. सी व आता नव्याने निर्माण झालेली आडाळी एम.आय.डी. सी. येथील उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाशी संबंधित उद्भवणाऱ्या व्यवसायातील अडचणी किंवा नव उद्योजकांचे प्रस्ताव घेऊन रत्नागिरी येथे जावं लागायच. त्यादिवशी जर अधिकारी उपलब्ध नसतील तर पुन्हा हेलपाटे मारावे लागत असत. त्यामुळे उद्योजकांना आर्थिक व मानसिक ञास होत होता. यासाठी आठ महिन्यापूर्वी कुडाळ एम्. आय्. डि. सी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बिपीन शर्मा यांची मुंबई येथे भेट घेऊन रत्नागिरी येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी कुडाळ येथील क्षेत्रीय कार्यालय उपस्थित राहाण्याची मागणी केली होती व निवेदन दिले होते. मात्र, याबाबत पुढील कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर व व्यापारी संघाचे पदाधिकारी द्वारकानाथ घुर्ये यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावर उद्योग मंत्र्यांनी तात्काळ डॉ. बिपीन शर्मा यांना दुरध्वनी करून याबाबत तात्काळ लेखी आदेश काढण्याच्या सुचना दिल्या. त्या नुसार डॉ. बिपीन शर्मा यांनी क्षेत्र व्यवस्थापकीय कार्यालयात येणारे प्रस्ताव किंवा उद्योजकांच्या इतर काही अडचणी यांचा तातडीने निपटारा करून कामात गतिमानता आणण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी रत्नागिरी यांनी दर महिन्याला बुधवारी कुडाळ येथील कार्यालयात उपस्थित राहून उद्योजकांच्या ज्या अडीअडचणी वा प्रस्ताव असतील त्यांचा तातडीने निपटारा करून कामात गतिमानता आणावी असे आदेश निर्गमित केले आहेत. उद्योग मंञ्यानी केलेल्या या कार्यवाहीमुळे उद्योजकांना आता रत्नागिरी येथे जावे लागणार नाही. असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी व उद्योजकांनी उद्योग मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बिपीन शर्मा यांचे विशेष आभार मानले आहेत.