तळेरेत जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा | विविध मान्यवरांची उपस्थिती

Edited by:
Published on: May 17, 2024 09:34 AM
views 274  views

कणकवली : तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कम्प्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शनिवार, दि. 18 मे रोजी सकाळी 11 वा. तळेरे येथील प्रज्ञांगन येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ युवा संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक प्रणय शेट्ये, सुप्रसिध्द नृत्य दिग्दर्शक, अभिनेते अनिल सुतार, अभिनेते कवी प्रमोद कोयंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. याचवेळी पुढील स्पर्धेची घोषणा करण्यात येणार आहे. 

जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीनही गटात मिळून एकूण ४०९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पहिल्या गटात संचिता संभाजी पाटील, दुसऱ्या गटात अनुश्री अभिजीत राणे तर तिसऱ्या गटात अक्षता मारुती गुंजाळ यांनी प्रथम क्रमांक मिळवला. शालेय मुलांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी आणि मानवाला उपजत मिळालेली लेखनशैली भविष्यात कार्यरत राहावी व अधिकाधिक विकसित व्हावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. दोन वर्षांच्या यशस्वी आयोजनानंतर तिसऱ्या वर्षीही या स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी व नववी ते बारावी अशा तीन गटात घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण सुलेखनकार अभिजीत राणे व सुलेखनकार युवराज पचकर यांनी केले. यावर्षी सुप्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांच्या सामाजिक आशयावरील कविता लेखनासाठी देण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. गट पहिला (पहिली ते चौथी) : (प्रथम तीन व उत्तेजनार्थ तीन) संचिता पाटील (शाळा ओटव), शिवन्या पचकर (विद्यामंदिर, लोरे-मोगरवाडी), रिया आग्रे (विद्यामंदिर, लोरे-मोगरवाडी), स्वरा ओतारी (केंद्रशाळा, साटेली भेडशी), दीपेश विटेकर (शाळा वजराट देवसू, वेंगुर्ले), सुकन्या नराम (विद्यामंदिर, लोरे) गट दुसरा (पाचवी ते आठवी) : अनुश्री राणे (एस. एम. हायस्कूल, कणकवली), रुद्र शेटे (विद्यामंदिर, गडमठ नं. १), लक्ष्मण सावंत (श्री माऊली विद्यामंदिर, डोंगरपाल), समर्थ शिरसाट (शिवडाव विद्यालय), संकेत गावकर (शिवडाव विद्यालय), श्रेया कदम (एस. एम. हायस्कूल) गट तिसरा (नववी ते बारावी) : अक्षता गुंजाळ (कुडाळ हायस्कूल), तनया कदम (एस. एम. कणकवली), प्रभाती देवळी (राजमाता सत्वशीलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालय), ऋतुजा परब (शिवडाव विद्यालय), वैष्णवी कुणकेरकर (कनेडी), ओंकार संजय सदडेकर (शिवडाव विद्यालय) या बक्षीस वितरण कार्यक्रमाला सर्व विजेत्या मुलांनी आपल्या पालकांसह उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.