प्रिया नासकर ठरली 'कोकणचा महाडान्सर ! 'कोकणसाद LIVE' दमदार मीडिया पार्टनर !

कुडाळ कन्या दीक्षा नाईक, संजना पवार उपविजेत्या ! कविलकाटे ग्रामसेवा संघ आणि साई जळवी फिल्मचे आयोजन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 24, 2023 12:28 PM
views 326  views

कुडाळ : कुडाळ-कविलकाटे ग्रामसेवा संघ निर्मित आणि साई जळवी फिल्म प्रस्तुत 'कोकणचा महाडान्सर' या भव्य-दिव्य डान्स स्पर्धा सोमवार दिनांक २३ रोजी कविलकाटे येथील श्री सिद्धि गणपती मंदिराच्या भव्य प्रांगणात पार पडला. या स्पर्धेत प्रथम विजेती ठरली ती कांदिवली - मुंबईची प्रिया नासकर. तिने एकेरी नृत्य सादर करत 'तुझा सातबारा हाय रं कोरा' या गाण्यावर बहारदार नृत्य करीत परीक्षक सिनेअभिनेते संतोष जुवेकर, झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' आणि कलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस सीजन चार' ची वेगळी ओळख अभिनेत्री रुचिरा जाधव यांचे विशेष लक्ष वेधत विजेतेपदाला गवसणी घातली.

 तर उपविजेता ठरल्या त्या कुडाळच्या दीक्षा नाईक व संजना पवार या कन्या. त्यांनी पंथीयांवरील सादर केलेले दुहेरी नृत्य अनेकांना अंतर्मुख करून गेले तर तृतीय क्रमांक उरण जि. रायगड येथील  विशाल म्हात्रे व ममता म्हात्रे हे बंधू-भगिनी ठरले असून त्यांनी 'वेसावची पारू नेसली ग' या कोळी गाण्यावर बहारदार नृत्य केले तर उत्तेजनार्थ क्रमांक व लक्षवेधी परफॉर्मन्स म्हणून समर्थ गवंडी (रेडी तालुका - वेंगुर्ला) यांनी सादर केलेले 'दमलेल्या बाबाची कहाणी तुला' ठरले.


कुडाळ - कविलकाटे येथील श्री सिद्धी गणपती मंदिराच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी सायंकाळी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत कविलकाटे ग्रामसेवा संघ निर्मित आणि साई जळवी फिल्म प्रस्तुत 'कोकणचा महाडांन्सर' ही भव्य सोलो आणि जोडी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथमच कुडाळ शहरात ही आंतरराष्ट्रीय दर्जाची नृत्य स्पर्धा झाली. या स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी व्यासपीठावर युवा उद्योजक व भाजपचे युवा नेते विशाल परब, कोकणसादचे उपसंपादक प्रा. रुपेश पाटील, पत्रकार शेखर सामंत, नगराध्यक्ष आफरीन करोल, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, उद्योजक संतोष सावंत, कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे नूतन अध्यक्ष दीपक नारकर, नगरसेविका ज्योती जळवी, साईनाथ जळवी, राजू जळवी यांसह मान्यवर उपस्थित होते.

 दरम्यान, या संपूर्ण स्पर्धेत कोकण, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी, पनवेल व मुंबई येथील कलावंतांनी आपल्या बहारदार अशा नृत्याचे सादरीकरण करत सिनेअभिनेते संतोष जुवेकर व अभिनेत्री रुचिरा जाधव यांच्यासह उपस्थित रसिकांची मने जिंकली. विजेत्या ठरलेल्या मुंबई कांदिवलीच्या प्रिया नासकर यांना रोख रुपये २५ हजार, प्रमाणपत्र व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. द्वितीय पारितोषिक ११,१११/ रुपये कुडाळच्या कन्या दीक्षा नाईक व संजना पवार यांनी पटकावले तर उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक ५,५५५/ रुपये हे रायगड उरणचे विशाल म्हात्रे व ममता म्हात्रे यांनी पटकावले तर उत्तेजनार्थ २१११/ रुपयाचे बक्षीस गोव्याच्या सोनाली उलगेकर यांनी पटकावले.


समर्थ गवंडींच्या 'दमलेल्या बाबाची कहाणी!'

अभिनेत्री रुचिरा जाधवांच्या डोळ्यात आले पाणी

 'कोकणच्या महाडान्सर' या स्पर्धेत सर्वात आकर्षक ठरले ते रेडी येथील समर्थ गवंडी यांनी सादर केलेले व सुप्रसिद्ध संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांनी गायलेले आणि संदीप खरे यांनी लिहिलेले 'दमलेल्या बाबाची कहाणी तुला!' हे नृत्य. समर्थ गवंडे यांनी अत्यंत भावनिकरित्या आपल्या या नृत्याने उपस्थितांना रडायला भाग पाडले.

 दरम्यान या नृत्याचे सादरीकरण झाल्यानंतर अभिनेत्री रुचिरा जाधव अत्यंत भावूक झाल्या व त्या बराच वेळ रडत होत्या. हे पाहून उपस्थित रसिकांनाही आपले अश्रू अनावर झाले. समर्थ गवंडीने सादर केलेले नृत्य 'लक्षवेधी परफॉर्मन्स' म्हणून गौरविण्यात आले.


कोकणच्या मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट!

 दरम्यान 'कोकणचा महाडांन्सर' या स्पर्धेचे परीक्षक व सुप्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर म्हणाले,  कोकण ही कलावंतांचीच भूमी आहे. मराठी रंगभूमी गाजविणारे अनेक दिग्गज कलावंत हे कोकणातले आहेत. कोकणच्या 'कोकणचा महाडांन्सर' या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक युवा कलावंतांमध्ये प्रचंड कौशल्य व टॅलेंट असून त्यांनी तात्काळ मायानगरी मुंबईत यावे, त्यांना माझ्याकडून व माझ्या फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मित्रांकडून हवे ते सहकार्य करण्यात येईल, अशीही ग्वाही जुवेकर यांनी दिली.

 

'कोकणसाद LIVE' ठरले दमदार मीडिया पार्टनर!

'कोकणचा महाडांन्सर' या संपूर्ण स्पर्धेचे मीडिया पार्टनर म्हणून नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड असलेले 'कोकणसाद LIVE'ने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्याबद्दल अभिनेते संतोष जुवेकर, अभिनेत्री रुचिरा जाधव, कोकण कला केंद्राचे अध्यक्ष साईनाथ जळवी यांनीही 'कोकणसाद LIVE'ला विशेष धन्यवाद देत यापुढेही सहकार्याचे आवाहन केले. 


निवेदक किरण खोत यांनी आणली स्पर्धेत रंगत!

'कोकणचा महाडांन्सर' या भव्य-दिव्य स्पर्धेचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक व अभिनेते किरण खोत यांनी केले. मालवणी, इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा विविध भाषांची 'खिचडी' करत त्यांनी संपूर्ण स्पर्धेत आपल्या सूत्रसंचालनाची विलक्षण छाप सोडली. शेवटी आभार साईनाथ जळवी यांनी मानले