
दोडामार्ग : समाजातील विविध प्रश्न निर्भयपणे मांडून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे ही मोठी जबाबदारी दोडामार्ग मधील पत्रकार पार पाडत आहेत, समाज मनाचा आरसा बनून तालुक्यातील पत्रकार आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा वैचारिक वारसा प्रामाणिकपणे पुढे नेत असल्याचे उद्गार हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष सावंत यांनी केले.
हळबे महाविद्यालयाच्या सहकार्याने दोडामार्ग पत्रकार समितीकडून आयोजित तालुका पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यातील पत्रकार आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा वैचारिक वारसा प्रामाणिकपणे पुढे नेत असून, समाजातील उचित व अनुचित घटनांना जनतेसमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे महत्त्व समजावे व या क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी महाविद्यालयात पत्रकारिता विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर दोडामार्ग पत्रकार समितीचे माजी अध्यक्ष व कोकणसाद व कोकणसाद LIVE चे संपादक संदिप देसाई, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष रत्नदीप गवस, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास देसाई, सचिव संदेश देसाई, उपाध्यक्ष महेश लोंढे, खजिनदार समीर ठाकूर, प्रा. डॉ. पी. डी. गाथाडे यांच्यासह पत्रकार गणपत डांगी, वैभव साळकर, ओम देसाई, गजानन बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी संपादक संदिप देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजात अन्याय होत असताना तो निर्भयपणे मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज पत्रकारिता अधिक सुलभ झाली असली, तरी मोबाईल युगापूर्वी ग्रामीण भागातून बातम्या पाठवताना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. जनतेला न्याय मिळवून देणे व प्रशासनाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार सातत्याने करत असतात.
सध्या पत्रकारितेकडे करिअरच्या संधी म्हणून पाहण्याचा कल वाढत असून, हळबे महाविद्यालय पत्रकारांसाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असल्याने त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. डी. गाथाडे यांनी केले. आभार रत्नदीप गवस यांनी मांडले.










