वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात तांत्रिक महोत्सवाची तयारी उत्साहात

Edited by: मनोज पवार
Published on: September 20, 2025 14:15 PM
views 163  views

वेळणेश्वर : गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी ‘नवोदय २०२५’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकी विभागांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, संपूर्ण राज्यातून विविध अभियांत्रिकी व विज्ञान शाखांतील विद्यार्थी या महोत्सवात सहभाग घेणार आहेत.

या तांत्रिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या ज्ञान, कौशल्य व सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या अनेक स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. संगणक अभियांत्रिकी विभागात Hackathon, Code Quest, Google It, PC Assembly, Tech Hustle, तसेच BGMI व Free Fire यांसारख्या ई-स्पोर्ट्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तर स्थापत्य अभियांत्रिकी विभागात Cube Testing, Bridge Making, Town Planning, Structural Photography व PPT Presentation यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, सहभागी विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची व आपली कल्पकता सिद्ध करण्याची नामी संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक शंतनू गुरव, भ्रमणध्वनी 8329036221,अभिषेक पवार, भ्रमणध्वनी 7887781228 यांच्याशी संपर्क साधावा. 

नवोदय २०२५' हा महोत्सव नवकल्पनांना चालना देणारा मंच ठरेल आणि राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक जाण व स्पर्धात्मकता वाढवेल. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य अविनाश पवार यांनी केले आहे.